प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित वरिष्ठ गट साखळी फूटबॉल स्पेर्धमध्ये शुक्रवारी फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठचा 3-0, तर पाटाकडील तालीम मंडळ (ब) ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळचा 3-1 असा पराभव केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धत फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ व संयुक्त जूना बुधवार पेठ संघा दरम्यान सामना झाला.पूर्वार्धात फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करत जुना बुधवार पेठ संघाला जेरीला आणले. संघाच्या मिचेल, रोहित मंडलिक, अनिकेत वरेकर, राजूदास यांनी जुना बुधवार पेठ संघावर चढाया केल्या. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला प्रतीक सावंत याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने मोठय़ा डी बाहेरून मारलेला फटका थेट गोलपोस्टमध्ये जाऊन विसावला. त्यामुळे संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला जुना बुधवारच्या अकिल पाटील याने डी मध्ये बॉल हाताळल्याने पंचांनी फुलेवाडीला पेनाल्टी बहाल केली. या संधिचा फायदा घेत फुलेवाडीच्या रोहित मंडलिक याने दुसरा गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जुना बुधवार पेठ संघाकडून रिचमोन्ड, सुशील सावंत, अकिल पाटील, शुभम सावंत यांनी चांगला खेळ केला. संघाच्या आघाडीच्या फळीतल्या शिबुने मारलेले अनेक फटके वाया गेले. तर रिचमोन्डच्या पासवर मिळालेली गोलची संधी शुभम सावंत याने दवडली. पुर्वार्धात फुलेवाडी संघ 2- द गोलने आघाडीवर होता.उत्तराधार्त सामन्याच्या 62 व्या मिनिटाला प्रतीक सावंतच्या पासवर फुलेवाडीच्या अनिकेत वरेकर याने गोल नोंदवून संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.जुना बुधवार पेठ संघांच्या पुढील फळीतील खेळाडूंच्या अनेक संधी वाया गेल्या. निर्धारित वेळेत सामना 3-0 असा राहिल्यानं फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने हा सामना एकतर्फी जिंकला.
तत्पूर्वी पाटाकडील तालीम मंडळ ब व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात सामना झाला.सुरवातीपासूनच पाटाकडील संघाने सामन्यावर वर्चस्व ठेवलं. संघाच्या प्रथमेश पाटील, वैभव देसाई, साईराज पाटील व उत्कर्ष फडतारे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवत चढाया केल्या. सामन्याच्या 15 व्या मिनिटाला पाटाकडील संघाच्या ओंकार देवणेने पाहिला गोल नोंदवत खाते खोलले. पाठोपाठ दुसरा गोल नोंदवत ओंकार देवणे याने संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तराधार्त ऋणमुक्तेश्वर संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचे दर्शन घडविले. संघाच्या अनिरुद्ध शिंदे, निलेश गायकवाड, ऋषीकेश पाडळकर यांनी गोल करण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांना अपयश आले. पाटाकडीलच्या यश देवणे याने सामन्याच्या 67 व्या मिनिटाला गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी धडपडणाया ऋणमुक्तेश्वर संघाच्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सामन्याच्या 70 व्या मिनिटाला सोमेश पाडळकर याने एकमेव गोल नोंदवून संघाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर पाटाकडील ब संघाने हा सामना 3-1 अशा गोल फरकाने जिंकला.
उद्याचे सामने –
दु. 2 वा. – उत्तरेश्वर वि.खंडोबा (ब)
सायं. 4 वा- प्रॅक्टिस (अ) वि. बालगोपाल