वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारी महिन्यात देशभरातील वाहनविक्रीत समाधानकारक वाढ दिसून आली आहे. एकंदर देशाची सरासरी विक्री लक्षात घेता प्रवासी वाहनविक्रीत 17.92 टक्के वाढ झाली असून एकंदर 2 लाख 81 हजार 380 वाहने विकली गेली. वाहननिर्मिती उद्योगांची संस्था एसआयएएमने ही आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध केली.
प्रवासी वाहनांप्रमाणेच व्यापारी वाहनांच्या विक्रीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी वाहनांची विक्री 14 लाख 26 हजार 865 इतकी झाली असून ती फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत जवळपास दीड लाखाने जास्त आहे. मोटारसायकलींच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात 11.47 टक्के वाढ झाली असून 9 लाख 10 हजार 323 मोटारसायकली विकल्या गेल्या आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये ही संख्या 8 लाख 16 हजार 679 इतकी होती. स्कूटरच्या विक्रीतही 10.9 टक्के वाढ झाली असून विक्री झालेल्या स्कूटर्सची संख्या 4 लाख 64 हजार 744 होती, जी फेब्रुवारी 2020 च्या संख्येपेक्षा साधारणतः 40 हजारने जास्त आहे. तिचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र 32.82 टक्के घट झाल्याचे पहावयास मिळाले. फेब्रुवारी 2020 मध्ये 41 हजार 300 तिचाकी वाहने विकत घेतली गेली होती. ती संख्या या फेब्रुवारी महिन्यात 27 हजार 331 पर्यंत घसरली. एकंदर दुचाकी व तिचाकी वाहनांचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात 17 लाख 35 हजार 584 वाहनांची विक्री झाली असून गेल्या वषी याच महिन्यातील ही संख्या 15 लाख 74 हजार 764 इतकी होती, असे एसआयएएमने म्हटले आहे.
दर वाढूनही मागणी अधिक
वाहननिर्मितीसाठी लागणाऱया पोलाद आदी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे काही श्रेणीतील वाहनांचे दर वाढले आहेत. भविष्यकाळात ते आणखी वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कोरोनामुळे पुढे ढकललेली वाहन खरेदी आता लोक धडाक्मयाने करीत आहेत, असे सध्याला दिसून येत आहे.