बँक व्यवस्थापक, पोलीस अधिकाऱयांच्या नावे फसवणूक
प्रतिनिधी /बेळगाव
सायबर क्राईम विभागाकडून जनजागृती करूनही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. फेसबुकवर फेक अकाऊंट काढून अधिकाऱयांच्या नावे सामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्याचा फटका बँक व्यवस्थापक व पोलीस अधिकाऱयांनाही बसला आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नरेशकुमार मीना यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट काढून फसवणूक करण्याचे प्रकार भामटय़ांनी सुरू केले आहेत. हा प्रकार नरेशकुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी सीईएन विभागात लेखी तक्रार केली आहे.
नरेशकुमार हे बँक व्यवस्थापक असल्यामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे.
फेसबुकवर 1700 हून अधिक मित्र आहेत. त्यांच्याच फोटोचा वापर करीत त्यांच्या नावे फेक अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्या अकाऊंटवरून प्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहेत. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी पैशाची गरज आहे, सध्या पाच हजार रुपये पाठवा, असे मॅसेज येत आहेत.
फेक अकाऊंट उघडून मॅसेज पाठविणाऱया भामटय़ांवर विश्वास ठेवून त्यांच्या काही मित्रांनी गुगल पेवरून 15 हजार रुपये पाठविले आहेत. रामप्रकाशसिंग रजपूत यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत नरेशकुमार यांनी सीईएन विभागाकडे तक्रार केली आहे. या भामटय़ांनी पोलीस अधिकाऱयांनाही सोडले नाही. यापूर्वीचे टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक व सध्या हुबळी-धारवाड येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजाविणारे मुत्तण्णा सरवगोळ व यापूर्वीचे शहापूरचे पोलीस निरीक्षक व सध्या गुलबर्गा जिल्हय़ात पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजाविणारे रविंद्र शिरुर या अधिकाऱयांच्या नावेही फेसबुकवर फेक अकाऊंट उघडण्यात आले आहे. या अधिकाऱयांनाही सायबर गुन्हेगारांचा उपद्रव सहन करावा लागला आहे.