‘संशयिताला अटक करा’, ‘आम्हाला न्याय द्या’ घोषणाबाजीसह भर पावसात वातावरण तंग
प्रतिनिधी/ फेंड़ा
ईस्लाम धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्याप्रकरणी संशयिताला तत्काळ अटक करावी. ‘वी वॉन्ट जस्टीस’ घोषणाबाजीसह फोंडयातील मुस्लिमबांधवानी काल शनिवारी सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत पोलीस स्थानकावर ठाण मांडल्यामुळे भर पावसात वातावरण तणावपूर्ण राहिले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी मजकूर पोस्ट करणाऱ्या बनावट आयडीधारकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फोंड्यात दोन दिवसापूर्वी ईद ए मिलाद निमित्त मुस्लिमबांधवांनी फोंडा शहरातून शांतताप्रिय भव्य मिरवणूक काढली होती. मागील 40 वर्षांपासून हा नित्यक्रमाने जुलूस मिरवणूक काढली जाते. प्रसारमाध्यमातर्फे पोस्ट केलेल्या मिरवणुकीच्या वार्तांकनात खाली कमेंट बॉक्समध्ये एका बनावट आयडीसह ईस्लाम धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यामुळे हा गेंधळ उडालेला आहे. बनावट आयडीधारकाने आपल्या अकाऊंटची टॅगलाईन ‘कॅच मी इफ यू कॅन’ अशी ठेवण्यात आल्यामुळे फोंडा पोलिसांनाही याप्रकरणी गुंतलेल्या संशयिताने एकप्रकारे आव्हान दिलेले आहे. सुमारे 300 च्या गटासह मुस्लिमबांधवांनी फोंडा पोलीस स्थानकावर धडक देऊन यांना याप्रकरणी सखोल कारवाई करावी, संशयिताला तत्काळ अटक करावी अशी मागणीवजा निवेदन पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांना सादर केले आहे. जोपर्यंत संशयिताला अटक करणार नाही तोपर्यंत पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करणार, ‘आम्हाला न्याय द्या’ भर पावसात पोलीस स्थानकासमोर आंदोलन करीत तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. फोंडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कुळे पोलीस व म्हार्दोळ पोलीस स्थानकाकडून अधिक फौजफाटा तैनात केला आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयिताविरोधात दोन वर्गामध्ये शत्रुत्व, द्वेष, दुर्भावना निर्माण करण्याच्या हेतूमुळे भा.दं.सं. 295 ए, 505 (2) कलमाअंतर्गत गुन्हा नेंदविण्यात आला आहे. फोंड्यातील युवा नेते काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी पोलीस स्थानकावर धाव घेऊन मुस्लिमबांधवांना आपला पाठिंबा जाहीर केला. सामाजिक तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संशयिताला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेण्याचे आवाहन करीत शांततापूर्ण तोडगा काढावा, असे आवाहन संतप्त मुस्लिमबांधवांनी केले.