वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वॉलमार्टअंतर्गत येणाऱया ‘फोन-पे’ने डिसेंबरमध्ये देवाणघेवाणीच्या अर्थव्यवहारात ‘गुगल पे’ला मागे टाकत आघाडीवरची युपीआय व्यवहार करणारी कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे.
फोन-पेने 1.82 लाख कोटी रुपयांचे 90 कोटी व्यवहार केले असून याच्या पाठोपाठ गुगल पेने 1.76 लाख कोटींचे 85.45 कोटी व्यवहार केले आहेत, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे. डिसेंबरच्या महिन्यामध्ये गुगल-पे च्या व्यवहारामध्ये 11 टक्के इतकी घट दिसली आहे. ही घट नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये नोंदली गेली आहे. दोन्ही ऍपचा युपीआय व्यवहाराच्या बाजारात 78 टक्के इतका वाटा आहे. तिसऱया नंबरवर पेटीएम राहिली असून त्यांनी 25.64 कोटी व्यवहार डिसेंबरमध्ये केले आहेत. यानंतर ऍमेझॉन पे 4 कोटी, भीम ऍप 2 कोटी व्यवहार करत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले आहेत. डिसेंबरमध्ये युपीआय अंतर्गत 223 कोटी व्यवहार केले आहेत. यांचे मुल्य 4.16 लाख कोटी रुपये इतके होते. ही आकडेवारी पाहता व्यवहार वाढले असून व्यवहार मूल्यही डिसेंबरमध्ये वाढल्याचे स्पष्ट होते.