प्रतिनिधी / बेंगळूर
मालमत्ता कर भरलेल्या व्यक्तीला महसूल अधिकाऱयांनी बनावट पावती देऊन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बेंगळूर महानगरपालिकेच्या 4 जणांविरुद्ध बनशंकरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
यडियूर अंजनेय देवस्थान येथील रहिवासी टी. रमेश यांनी फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली होती. याच्या आधारे बेंगळूर महापालिका कार्यालयातील महसूल निरीक्षक एच. रामय्या, महसूल वसुली कर्मचारी श्रीनिवास, कॉम्प्युटर ऑपरेटर प्रदीप व मंजुनाथ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
जानेवारी 2010 मध्ये रमेश हे मालमत्ता कर भरण्यासाठी यडियूर येथील महापालिकेच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी 2010 ते 2018 या कालावधीपर्यंतचा 4 लाख रुपये महसूल जमा केल्यानंतर त्यांना पावता देण्यात आली होती. मागील महिन्यात (एप्रिल 2021) ते 2018 पासून आतापर्यंतचा कर भरण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱयांनी त्यांना 2010 पासूनचा कर थकित असल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या रमेश यांनी यापूर्वी भरलेल्या मालमत्ता कराची पावती आणून दाखविली असता ती बनावट असल्याचे सांगण्यात आले.
फसवणूक झाल्याने रमेश यांनी बनशंकरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यापूर्वी आपण 4 लाख रु. कर भरून देखील बनावट पावती दिल्याचा आरोप त्यांनी अधिकाऱयांवर केला आहे.