प्रत्येकी पाच लाख रुपये दंड : एकाला 5 वर्षे, 5 हजार दंड, अंकोल्याचे उद्योजक आर. एन. नायक खून खटला
प्रतिनिधी /बेळगाव
3 कोटींची खंडणी मागितल्यानंतर ती देण्यास नकार दिल्याने बन्नंजे राजा ऊर्फ बी. आर. ऊर्फ राजेंद्रकुमार याने अंकोल्याचे उद्योजक आर. एन. नायक यांचा आपल्या समर्थकांकडून गोळ्या झाडून भीषण खून केला होता. या खून खटल्यातील 16 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील तिघे संशयित अद्याप फरार आहेत तर तीन संशयितांना न्यायालयाने निर्दोष म्हणून जाहीर केले होते तर एका संशयिताचा मृत्यू झाला होता. 9 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले होते. यामधील आठ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख असा दंड ठोठावला आहे. तर यामधील एका आरोपीला 5 वर्षे आणि 5 हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील कोका न्यायालय आणि जिल्हासत्र न्यायालयाने सुनावली आहे.
अंकोला येथील उद्योजक आर. एन. नायक यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी येथील कोका न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर यामधील 9 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर सोमवार दि. 4 रोजी या सर्वांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
मुख्य आरोपी बन्नंजे राजा ऊर्फ बी. आर. ऊर्फ राजेंद्रकुमार (वय 45, रा. बापुथोटा, कडवुरू, माल्पे, जि. उडपी), जगदीश ऊर्फ सतीशकुमार कटवारपटेल (वय 21, रा. उत्तरप्रदेश), अभी ऊर्फ अंबाजी भीमसा बंडगार (वय 35, रा. अलमेल, जि. विजापूर), गणेश ऊर्फ मंजुनाथ ऊर्फ लक्ष्मण नारायण भट्ट (वय 29, रा. इडू, ता. कर्कला, जि. उडपी), महेश ऊर्फ अचंगी महेश बसवणगौडा (वय 34, रा. अचंगी, ता. सखलेशपुरा, जि. हासन), संतोष एम. बी. ऊर्फ सुल्या संतोष बाळगौडा (वय 27, रा. सुल्या, जलमपड्डी, कासरगोड, केरळ), जगदीश चंद्रराज अर्स (वय 42, रा. आरटीनगर, बेंगळूर), अंकितकुमार श्रवणकुमार काशप् (वय 26, रा. बडेखाजीपूर, तिवारीपूर, उत्तरप्रदेश) या सर्वांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तर के. एम. इस्माईल ऊर्फ मोसा (वय 47, रा. परीलपंचायत ता. जि. पलक्कड, केरळ) याला 5 वर्षे शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड, दंड भरला नाही तर दोन वर्षे साधी कैद अशी शिक्षा कोका न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी सुनावली आहे.
तिघेजण अद्याप फरार
या खटल्यातील आरोपी क्रमांक 6 रवीन सलीम नागनूर पिचई (वय 40, रा. पुरूर, तामिळनाडू), मोहम्मद रशद शहाबंदरी ऊर्फ बाबू सादीक अकबर शहाबंदरी (वय 37, रा. मनवारपेठ, बेंगळूर), आनंद रमेश नाईक (वय 42, रा. होनीहळ्ळी, ता. कुमठा, जि. कारवार) यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील नजीम निल्वर ऊर्फ मोहम्मद निल्वर (वय 55, रा. भटकळ, जि. कारवार), हाजी अमीन बाशा अर्फ पाशा मोहम्मद (वय 66, रा. विद्यानगर, अत्वार, मंगळूर), सुलेमान ऊर्फ सल्लू ऊर्फ भाया जिन्नुद्दीन (वय 28, रा. यलहंक, सुब्रबन, बेंगळूर) हे अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
अंकोला (जि. कारवार) येथे बाजारात असलेल्या आपल्या कॉम्प्लेक्समध्ये दि. 21 डिसेंबर 2013 रोजी उद्योजक आर. एन. नायक आले होते. काम आटोपून परतत असताना मारुती व्हॅनमधून आलेले आरोपी विवेक व्ही. उपाध्याय (रा. उत्तर प्रदेश), जगदीश पटेल (रा. उत्तर प्रदेश) अभी ऊर्फ अंबाजी बंडगार (रा. विजापूर, सध्या रा. बेंगळूर) आणि गणेश ऊर्फ मंजुनाथ बजंत्री (रा. उडपी) यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात उद्योजक आर. एन. नायक हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या गनमॅनने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये विवेक उपाध्याय हा जागीच ठार झाला होता. मात्र त्यानंतर गनमॅनने आरोपी जागदीश पटेल याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता बन्नंजेराजा याच्या सांगण्यावरून आम्ही हा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील आरोपींना जेरबंद केले होते.
कोका कायदा कलम 3(1), 2(3), 4 अन्वये या सर्वांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येकी 5 लाख असे एकूण 40 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून के. जी. पुराणीकमठ यांनी काम पाहिले आहे.
न्यायालयात गर्दी
आर. एन. नायक खून खटल्यातील मुख्य आरोपी बन्नंजेराजासह 9 जणांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना शिक्षा किती होणार, याकडे साऱयांचेच लक्ष लागले होते. त्यामुळे सकाळपासूनच न्यायालयात गर्दी झाली होती. अखेर यामधील आठ जणांना जन्मठेप आणि एकाला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे.