ऑनलाईन टीम / मनामा :
बहरिनचे पंतप्रधान शेख खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. अमेरिकेतील के मायो क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. बहारिन न्यूज एजन्सीने यासंदर्भात ट्विट केले आहे.
24 नोव्हेंबर 1935 ला शेख खलिफा यांचा जन्म बहरिनच्या राजघराण्यात झाला होता. 15 ऑगस्ट 1971 ला बहारिनला स्वातंत्र्य मिळाले. त्यापूर्वी एक वर्ष आधीच म्हणजे 1970 साली त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. खलिफा यांनी जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे.
शेख खलिफा यांच्यावर बहरिनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव अमेरिकेतून बहरिनमध्ये आणण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.