मनसा वाराणसीला मिस इंडियाचा किताब मिळाला खरा पण मान्या सिंहचं यश खूप वेगळं ठरलं. छोटय़ा गावात राहूनही मोठी स्वप्नं बघता येतात आणि मुख्य म्हणजे ती पूर्ण करता येतात हे मान्याने दाखवून दिलं आहे. मान्या ही उत्तर प्रदेशमधल्या छोटय़ाशा गावची मुलगी. तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करतात. मात्र परिस्थिती मान्याच्या स्वप्नांच्या आड कधीही आली नाही. मान्याने लहानपणापासून खूप संघर्ष बघितला. तिला अनेक रात्री उपाशी पोटी झोपावं लागलं. उपासमारीमुळे बरेचदा झोपही यायची नाही. तिला अर्थार्जनासाठी खूप लवकर घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळे तिला शाळेत जाता आलं नाही. पण तिला शिकण्याची खूप ओढ होती. त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी तिने घरापासून लांब मुंबईला जाऊन शिक्षण घ्यायचं ठरवलं. तिने नोकरी करत शिक्षण घेतलं. शाळा झाल्यानंतर ती पिझ्झा सेंटरमध्ये काम करायची. इथे तिला भांडी घासण्यासारखी कामंही करावी लागली. रात्री तिने कॉल सेंटरमध्ये काम केलं. शाळा, नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ बसवताना तिच्या नाकी नऊ यायचे. पण मान्याने कधीही हार मानली नाही. अशा परिस्थितीतच तिने दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ती 80 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी मान्य ठिकठिकाणी चालत जायची. अर्थात या संघर्षाने तिला मानसिकदृष्ट्या कणखर बनवलं आणि हाच कणखरपणा आज तिला उपयोगी पडला. तिच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. तिला फक्त मिळवायचं होतं. या संघर्षात मान्याला तिच्या कुटुंबियांची साथ लाभली. आई-वडीलांनी मान्याला पूर्ण पाठींबा दिला आणि म्हणूनच ती या ठिकाणी पोहचू शकली.
मान्याला वयाच्या पंधराव्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेबद्दल कळलं. एक दिवस आपणही हा किताब जिंकून कुटुंबियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवू असं तिच्या मनात आलं. मात्र काहींनी तिचं मानसिक खच्चीकरण केलं. मुलींना शिक्षण घेतल्यानंतरही लग्नच करावं लागतं, असं सांगण्यात आलं. पण वडिलांनी मान्याला नेहमीच धीर दिला. आपल्या मुलीनी आयुष्यात काहीतरी करावं, असं त्यांना वाटायचं. मुलीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तेही झटले. मान्याने जवळपास दहा सौंदर्यस्पर्धांसाठी चाचणी दिली. मात्र तू दिसायला चांगली नाहीस, तुझं इंग्रजी चांगलं नाही असे टोमणे तिला ऐकावे लागले. मुलीच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी दागिने गहाण टाकले होते. त्यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी मान्य पिझ्झा सेंटरमध्ये फरशीही पुसायची. पिझ्झा सेंटरमध्ये काम करत असताना ती तिथे येणार्या लोकांना न्याहाळायची, त्यांची देहबोली समजून घ्यायची. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींकडून इंग्रजी शिकायची. या सगळ्यातून तिने स्वतःला घडवलं. मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती ठरल्यामुळे आपलं आयुष्य बदलल्याचं मान्या सांगते. आता तिला स्वतःसोबतच कुटुंबाचं आयुष्य बदलायचं आहे. स्वतःची स्वप्नं पूर्ण करायची आहेत. ती आपल्या कुटुंबासाठी घर घेणार आहे. हारके जितनेवाले को बाजीगर कहते हैं, हा बाजीगर चित्रपटाला संवाद चांगलाच गाजला. मान्याला मिस इंंडियाचा किताब, तो झळाझता मुकुट मिळाला नसला तरी तीच खरी बाजीगर ठरली आहे.