25 टक्के कंटेन्मेंट झोन अपार्टमेंटमध्ये : महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना : परराज्यातून येणाऱयांमुळे संसर्गाचा धोका
प्रतिनिधी /बेंगळूर
बेंगळूर शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी बेंगळूर महापालिकेने अधिक रुग्ण असणारा परिसर सीलडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील 25 टक्के कंटेन्मेंट झोन हे अपार्टमेंटमध्येच आहेत. अपार्टमेंटमध्ये अधिक रुग्ण आढळून येत असल्याने ते सीलडाऊन करण्यात येत आहे. सध्या बेंगळूर शहरात 136 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामधील 25 टक्के अपार्टमेंट आहेत. अशा अपार्टमेंटमध्ये लोक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे संसर्ग वाढल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
बेंगळूरमध्ये कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱयांची कोविड चाचणी करून अहवाल येईपर्यंत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील अनेक नागरी वसत्यांमध्ये देखील कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. अपार्टमेंटमध्ये एका बाधित व्यक्तीमुळे इतरांना वेगाने कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
बेंगळूर शहराच्या पश्चिम भागात अपार्टमेंटमध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शनिवारी शहरात 35 कंटेन्मेंट झोन होते. त्यामध्ये 13 कंटेन्मेंट झोन हे अपार्टमेंटध्येच होते, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली आहे. अपार्टमेंटमध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या अनेक जणांनी आंतरराज्य प्रवास केला असल्याचे आढळून आले आहे.
बोम्मनहळ्ळी विभागात सर्वाधिक कोरोना प्रकरणे नोंद झाली आहेत. यलहंका विभागात 2, महादेवपूर विभागात 2 आणि बोम्मनहळ्ळी विभागात 4 अपार्टमेंटना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. रविवारी यशवंतपूरमधील एका अपार्टमेंटमध्ये 21 रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण अपार्टमेंट सीलडाऊन करण्यात आला आहे.
महापालिकेचे विशेष आयुक्त डी. रणदीप याविषयी म्हणाले, अपार्टमेंटमध्ये मोठय़ा संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत असल्याची माहिती अधिकाऱयांना मिळाली आहे. आंतरराज्य प्रवास करून आलेल्या अनेक जणांमुळे कोरोना फैलावत आहे. त्यामुळे शहरात कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल नसताना बेंगळुरात येणाऱया केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कोविड चाचणी करून संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. सोमवारपासूनच संस्थात्मक क्वारंटाईन नियम जारी करण्यात आले आहेत.
शहरातील विविध भागातील कोविड केअर सेंटर महापालिकेने अद्याप बंद केलेले नाही. अनेक ठिकाणी सध्या रुग्णही नाहीत. त्यांचा वापर परराज्यातून येणाऱयांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे.
बेंगळुरात नाईट कर्फ्यू जारी
राज्याच्या राजधानीत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने खबरदारी म्हणून मंगळवारपासून रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार असून वाहने जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बेंगळूर महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. एखाद्या वेळेस नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर वावरताना दिसल्यास आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
मार्शलांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई
नाईट कर्फ्यू कालावधीत महापालिकेच्या मार्शलांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस कारवाई करणार आहेत. अत्यावश्यक सेवांनाच या कालावधीत मुभा असणार आहे. नाईट कर्फ्यू कालावधीत विमानतळावर जाणाऱयांना, रुग्णांना इस्पितळात नेणे किंवा डिस्चार्ज मिळालेल्यांना घरी आणण्याची मुभा असणार आहे. रात्रपाळीतील कामासाठी जाणाऱयांना पास दाखवून कंपनी वा कारखान्यात जाता येईल. विमान, रेल्वे, बसप्रवासासाठी योग्य माहिती संबंधितांना द्यावी लागणार आहे.