बेंगळूर/प्रतिनिधी
बांगलादेशी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एकाला बेंगळूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाबाज म्हणून ओळखल्या जाणार्या आरोपीला पोलिसांनी गोळ्या घालून जखमी केले होते. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसांच्या पथकावर हल्ला करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार करून जखमी केले आणि त्यांनतर त्याला अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० लोकांना अटक केली आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहितीनुसार पोलिसांचे एक पथक शाहबाजला पकडण्यासाठी रामपूर येथे गेले. “जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोचले तेव्हा त्या व्यक्तीने पोलिसांवर चाकूने हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या क्षणी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला पकडले, ” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या आठवड्यात, पोलिसांनी घटनास्थळी गुन्हेगाराला नेले असता त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील इतर दोन आरोपींवर गोळीबार केला होता.
राममूर्ती नगरातील एका महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी बेंगळूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात दोन महिलांसह सात जणांना अटक केली होती. आसाममधील सोशल मीडियावर या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.