वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेल्जियमविरुद्ध होणाऱया एफआयएच प्रो लीगमधील सामन्यांसाठी हॉकी इंडियाने 24 सदस्यीय संघाची घेषणा केली असून मनप्रीत सिंग या सामन्यांत भारताचे नेतृत्व करणार आहे. या संघात राज कुमार पाल हा एकमेव नवा चेहरा आहे.
जागतिक अग्रमानांकित बेल्जियमविरुद्धचे हे सामने 8 व 9 फेबुवारी रोजी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर होणार आहेत. हरमनप्रीत सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या मोसमात इंडिया कोल्ट्स संघातून खेळताना राज कुमार पालने प्रभावी कामगिरी केली असल्याने त्याला संधी देण्यात आली आहे. इंडिया कोल्ट्स संघाने मलेशियात झालेल्या सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळविले होते. अनुभवी पीआर श्रीजेश, कृशन पाठक, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, जर्मनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग यांचाही या संघात समावेश आहे.
‘उपलब्ध खेळाडूंना ऑलिम्पिक निवडीसाठी संधी उपलब्ध करून देणे, सर्वोत्तम संघ तयार करणे आणि जगातील कोणत्याही संघाविरुद्ध आपण स्पर्धा करू शकतो, हे दाखवून देणे यातील समतोल साधण्यासाठी एफआयएच हॉकी प्रो लीगमधील सामन्यांत खेळण्याचा प्रमुख उद्देश आहे. अलीकडे झालेल्या शिबिरात राज कुमार पालने उत्कृष्ट फॉर्म दाखविला असल्याने त्याचे बक्षीस त्याला देण्यात आले आहे. त्याच्याकडे असाधारण कौशल्य व वेग असून बेल्जियमविरुद्ध त्याला संधी दिल्यास तो चमक दाखवून हे सिद्ध करू शकेल,’ असे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले.
या लढतीसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ : पीआर श्रीजेश, कृशन बहादूर पाठक, हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, जर्मनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, चिंगलेनसाना सिंग, राज कुमार पाल, दिलप्रीत सिंग, हार्दिक सिंग, रमनदीप सिंग, ललिक कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, समशेर सिंग, गुरसाहिबजित सिंग, कोठाजित सिंग कडंगबम, बिरेंद्र लाक्रा, निलकांता शर्मा, गुर्जंत सिंग, एसव्ही सुनील.