राज्य निवडणूक आयोगाची बेंगळूर उच्च न्यायलयाला माहिती : निवडणुकीसंबंधी चर्चेसाठी आज आयोगाची बैठक
प्रतिनिधी /बेंगळूर
बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला सादर केली आहे. राज्यातील अनेक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला असून निवडणुका वेळेत घेण्याबाबत काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्वयंप्रेरित सुनावणी वेळी चार महिन्यात निवडणुका घेण्याचा आदेश यापूर्वी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने दिली होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे तसेच काही पालिकांची आरक्षण यादी तयार झाली नसल्याने निवडणुका घेणे शक्मय झाले नव्हते.
सदर याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाचे वकील के. एन. फणिंद्र यांनी युक्तीवाद करताना हुबळी-धारवाड, बेळगाव, आणि गुलबर्गा महानगरपालिका तसेच दोड्डबळ्ळापूर नगरपालिका आणि तरिकेरे नगरपरिषदेची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवार दि. 20 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. वस्तूस्थिती विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने न्यायालयात दिली.
धारवाड खंडपीठामध्येही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. होस्पेट, गदग-बेटगेरी, अण्णीगेरी या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची अधिसूचना सरकारने मागे घेतली असून नवी आरक्षण यादी जाहीर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे, अशी बाब निवडणूक आयोगाच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने सांगितले. त्यानंतर खंडपीठाने सुनावणी 4 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.
धारवाड खंडपीठातील याचिकेकडे बेळगावकरांचे लक्ष
बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. सदर सुनावणीमध्ये देखील राज्य निवडणूक आयोगाने म्हणणे मांडण्यासाठी अवधी घेतला होता. त्यामुळे या याचिकेमध्ये निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.