प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा ग्राहक न्यायालयातून खटले निकालात काढले जात आहेत. मात्र, त्यानंतर अनेक जण उच्च न्यायालयात धाव घेत आहेत. त्यामुळे पक्षकारांना बेंगळूरच्या ग्राहक न्यायालयाच्या आयुक्तांकडे धाव घ्यावी लागते. त्यामध्ये पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होत असतो. तेव्हा बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालय सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत, राज्याच्या ग्राहक आयुक्तांनी सरकारकडे बेळगावात सर्किट बेंच सुरू करावे, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बेळगावला दिलासा मिळाला आहे.
ग्राहक न्यायालयामध्ये महिन्याला 200 ते 250 खटले निकालात काढले जातात. मात्र यामधील बहुसंख्य खटले अपिल केले जातात. बेंगळूर अपिल ग्राहक आयुक्तांकडे ते खटले दाखल होतात. त्यामुळे पक्षकारांना त्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. यासाठी बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांनी बेळगावमध्ये ग्राहक न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल ग्राहक न्यायालयाच्या आयुक्तांनी घेतली आहे.
राज्य ग्राहक आयोग कमिशन यांनी दखल घेतल्यानंतर बेळगावला न्यायालय स्थापन झाल्यास उत्तर कर्नाटकाला त्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खटले निकालात निघू शकतात. ही बाब बेळगावच्यादृष्टीने आता फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी राज्य ग्राहक आयोगाच्या आयुक्तांनी सरकारकडे पाठपुरावा करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.