दरवर्षी आग लावण्याचे प्रकार; ग्रामस्थांचा आरोप : वीजवाहिन्याखाली कचऱयाचे डीग
प्रतिनिधी /फोंडा
बोरी-बेतोडा बायपास रस्त्यावर बोणबाग येथे शक्ती सेल्स भंगारअडय़ाजवळील कचऱयाला आग लागली. सदर घटना काल सोमवारी दुपारी 2.30 वा. सुमार उघडकीस आली. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार भंगारअडय़ातर्फे भंगारात काढलेल्या दोन अवजड वाहने आगीत भक्ष्यस्थानी होती. फोंडा अग्निशामक दलाने महत्वाचे मदतकार्य करताना आग विझवण्यात यश मिळवले, तसेच दोन्ही भंगारातील वाहने आगीपासून वाचविले. भंगारातील वाहने आपली असल्याचा दावा भंगारअंडय़ावाल्यांनी केला असून कचरा आपला नसल्याचे म्हटले आहे.
भंगारअड्डय़ामुळे प्रदुषण, वीजवाहिन्याखाली मोठया प्रमाणात कचरा
मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी या भंगारअडय़ाला लाग लावण्याचे प्रकार नित्यनेमाने घडत असतात. भंगारअडय़ातील थर्माकोल, केमिकलचे डबे व अन्य टाकावू सामानाला आग लावण्याचे प्रकार होत असल्याचे आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना धूर खावा लागतो. याविषयी पंचायत कार्यालयात, प्रदुषण विभागाला तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येते. सद्यपरिस्थितीत भंगारअडय़ावाल्यातर्फे वीजवाहिनीच्या खाली मोठया प्रमाणात भंगार कचरा, फायबर, लाकडी कचरा साठवून ठेवण्यात आलेला आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वीजखात्याचे डोळे उघडणार असल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांनी दिली.