प्रतिनिधी/इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील मारुती उर्फ तात्या पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व युनिर्व्हसल बेवरेज पाणी शुध्दिकरण कंपनीच्या व्यवस्थापनाने ठेवीस वार्षिक 24 टक्के व्याजदराचे आमिष दाखवून 40 हून अधिक लोकांची 1 कोटी 21 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संस्थापक मानसिंग मारुती पाटील, स्नेहलकुमार मानसिंग पाटील, जितेंद्र मानसिंग पाटील (रा. बोरगाव,) या पिता-पुत्रांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बोरगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.
संदीप शिवाजी पाटील (40) यांनी दिलेल्या वर्दीत म्हटले आहे की, शेतीत मिळालेल्या उत्पन्नातून सन 2015 पासून वेळोवेळी गावातील मारुती पाटील पतसंस्थेत ठेव पावत्या केल्या होत्या. यामध्ये त्यांच्यानावावर 3 लाख रुपये ठेवले होते. तसेच कुटुंबातील लोकांच्या नावावर ही रक्कम ठेवली होती. दि.13 मार्च 2018 मध्ये पाटील पुत्रांनी त्यांच्या घरी बोलवून पतसंस्थेत असणाऱया ठेवी बेवरेज पाणी शुध्द करणाऱया कंपनीत गुंतवा. तुम्हाला पतसंस्थेपेक्षा जास्तीत जास्त व्याज देवू. या कंपनीच्या बेंगलोर, गोवा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी या जिल्हय़ात मार्केटींग असून रकमेवर 24 टक्के व्याज परतावा मिळवा असे सांगितले.
त्यानंतर पाटील विश्वास ठेवून त्यांच्यासह पत्नी सुरेखा, आई शालन व मुलगा यांच्या नावावरील प्रत्येक 2 लाख, मुलगी स्नेहा हिच्या नावावरील 1 लाख व वडिल शिवाजी यांच्या नावावरील 4 लाख 68 हजार रुपये, असे एकूण 14 लाख 68 हजार रुपये वर्ग केले. या पावत्यांची मुदत दि. 13 मार्च 2019 रोजी पूर्ण झाली. त्यामुळे पाटील मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात त्या पावत्या घेऊन बेवरेजच्या कार्यालयात गेले. त्यांनी पावत्या मोडायच्या असल्याचे सांगितले. दरम्यान संस्थापक पाटील व त्याचा मुलगा स्नेहल यांना पैसे देण्याबाबत विनवणी केली. या दोघांनी एस.एम.एच मर्चन्डाईस प्रा.लि.दिल्ली यांच्याकडील लोन मंजुरीचे पत्र दाखवले. ते मिळताच आपल्या ठेवी परत करु, असे सांगितले. ऑगस्ट 2019 पर्यंत पाटील यांनी वाट पाहिली. पुन्हा पाठपुरावा केला असता, मुंबईच्या विस्तारा फायनान्सरचे पत्र दाखवून त्यांना थांबवले.
तसेच युनियन बँक व शाखा दारुखाना या ठिकाणी युनिव्हर्सल बेवरेजचे 20 कोटी रुपये ठेवीवर कर्ज मंजुरी झाली असून लवकरच रक्कम परत करु असे सांगितले. त्यानंतरही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आपल्यासह 38 जणांची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची व ठेवीच्या रकमेची मागणी केल्यानंतर संस्थापक व त्याच्या मुलांनी दमदाटी केल्याची वर्दी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली.
फसवणूक झालेले ठेवीदार
फसवणूक झालेले ठेवीदार व रक्कम अशी, बाळासाहेब देसाई (1 लाख रुपये), रंजना देसाई (1 लाख 45 हजार रुपये), अभिजित वाटेगावकर व भगवान वाटेगावकर (दोघे मिळून 1 लाख 10 हजार रुपये), जीवन हणमंत माने, गायत्री जीवन माने, ओंकार जीवन माने तिघे मिळून (साडे आठ लाख रुपये), दीपक चौधरी (साडे सहा लाख रुपये), दादासो पाटील, शशिकांत पाटील दोघे मिळून (2 लाख), जितेंद्र जयवंत पाटील, स्नेहा (10 लाख 30 हजार), जयवंत शामराव पाटील, मंगल पाटील, राहूल पाटील तिघे मिळून (8 लाख 40 हजार रुपये), कोमल राहूल पाटील(2 लाख 90 हजार), अपर्णा शिंदे(1 लाख 30), आशा टिळे(1 लाख), सायली वादवणे(1 लाख), तेजस वादवणे(1 लाख), सुवर्णा वादवणे(1 लाख), संतोष टिळे(1 लाख), हणमंत पाटील(5 लाख), पुष्पा पाटील(5लाख), निलिम पाटील(2 लाख 50 हजार) सतीशचंद्र पाटील (2 लाख 82 हजार), संगीता वाटेगावकर(दीड लाख रुपये), काशिनाथ वाटेगावकर (1 लाख), शुभम् रामपूरे(50हजार), लक्ष्मी रामपूरे(50 हजार), शालन शिंदे(3 लाख), अनुष्का शिंदे(4 लाख), अनिल शिंदे(4 लाख), तुनजा शिंदे(3 लाख 20 हजार), श्रीवर्धन शिंदे(4 लाख), दिपक पाटील(15 हजार) कैलास पाटील, नागराळे(3 लाख 80 हजार), संतोष ढेरे, पलूस(16 लाख रुपये)