भारतासह अनेक देशांची सध्या अफगाणिस्तानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यामुळे त्या देशाची राजधानी काबूल येथील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळाला अक्षरशः जत्रेचे स्वरुप आल्याचे दिसून येते. त्या देशाचा ताबा घेतलेल्या तालिबानवर जग विश्वास ठेवण्यास तयार नाही, हेच या धावपळीवरुन स्पष्ट होते. अर्थात, हे साहजिकच आहे. कारण तालिबानचा इतिहास त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नाहीच. साधारणतः 26 वर्षांपूर्वी हाच तालिबान याच देशात सत्ताधीश झाला होता आणि त्यानंतरच्या सहा वर्षांमध्ये त्याने ज्या पद्धतीने राज्य केले होते, ती मध्ययुगीन होती. घडय़ाळाचे काटे बाराशे-चौदाशे वर्षे मागे फिरविले गेले होते आणि अफगाणिस्तान असहय़ अशा धार्मिक अत्याचारांमध्ये होरपळून निघत होता. दहशतवादासाठी तेथील वातावरण इतके अनुकूल होते की त्यावेळची सर्वात क्रूर दहशतवादी संघटना अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेननेही त्या देशात आश्रय घेऊन आपल्या संघटनेच्या कारवाया जगभरात चालविल्या होत्या. पुढे अमेरिकेतच दहशतवादी हल्ले झाले आणि अफगाणिस्तानमधील दहशतवाद उखडल्याशिवाय तरणोपाय नाही, हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने तेथे मोठय़ा प्रमाणात सेना पाठविली. 20 वर्षे अमेरिकेचे सैनिक तेथे असूनही तालिबान किंवा दहशतवाद यांचा पुरता बिमोड करणे शक्य झाले नाही. आता याच तालिबानच्या हाती पुन्हा अफगाणिस्तानचा ताबा आला आहे, आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे. 80 च्या दशकात रशियाची हीच अवस्था तालिबानमुळेच झाली होती. परिणामी, आता तालिबानने कितीही सौम्यपणाची भाषा केली असली तरी जोपर्यंत ती प्रत्यक्षात उतरत नाही, तो पर्यंत जगाचा विश्वास बसणार नाही हे उघड आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील लोकांचे जे व्हायचे ते होवो, आपले नागरिक आणि आपले समर्थक सुरक्षित राहिले पाहिजेत, एवढय़ाच मर्यादित कार्यकक्षेत सध्या जग वावरताना दिसते. 31 ऑगस्टपर्यंत सर्व विदेशी सैनिक मागे गेले पाहिजेत, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी सरळ धमकी तालिबानने दिली आहे आणि अमेरिकेसह सर्व देशांनी त्या आधी आपले नागरिक बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, केवळ आपले नागरिक त्या देशातून बाहेर काढून जगासमोरचा प्रश्न सुटेल काय ? या प्रश्नाचे स्वच्छ उत्तर नाही असे आहे. कारण एक गेल्या आठवडय़ाहून अधिक काळात तालिबानने आपले खायचे दात दाखवावयास काही प्रमाणात प्रारंभ केला आहे. त्या देशातून जी वृत्ते हाती येत आहेत, ती भविष्याची चिंता वाढविणारीच आहेत. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने अनेक दिलासादायक आश्वासने दिली होती. सूडबुद्धीने वागणार नाही, हे त्यापैकी सर्वात महत्वाचे आश्वासन होते. तथापि, ज्यांनी अमेरिकेला साहाय्य पेले अशा अफगाण नागरिकांचा शोध तालिबानने हाती घेतला आहे. या नागरिकांचे तालिबान काय करणार, हे जरी स्पष्टपणे सांगण्यात आलेले नसले, तरी त्यांचे जे होईल ते चांगले नसेल, एवढे म्हणता येण्यासारखी स्थिती निश्चितच आहे. याशिवाय मुले आणि मुली यांच्या एकत्रित शिक्षणाची पद्धती काही भागांमध्ये बंद करण्यात आली आहे. बुरखा न घातलेल्या महिला आणि जीन्स घातलेले तरुण यांना तालिबानच्या हस्तकांनी मारहाण केल्याचीही वृत्ते येत आहेत. लोकांनी वेषभूषा कोणती करावी, त्यांची दिनचर्या कशी असावी, शिक्षण कोणते आणि कसे घ्यावे, समाजात महिलांचे स्थान काय आणि कसे असावे, उद्योग व्यवसाय कशा प्रकारे करावेत इत्यादींचा निर्णय तालिबान कट्टर इस्लामधर्मिय तत्वांनुसार घेईल, याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अर्थात यासंबंधी चित्र स्पष्ट होण्यास काही काळ थांबावे लागणार आहे. काय होणार आणि कशा पद्धतीने होणार यावर आत्ताच निश्चित भाष्य करता येणे अवघड आहे. चित्र पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये स्पष्ट होईल, तोपर्यंत ‘थांबा आणि वाट पहा’ याच भूमिकेत जग राहील असे वाटते. सांगितले जाते, त्यानुसार तालिबानमध्ये खरोखरंच परिवर्तन झाले असेल आणि नव्या काळाचे अनुसरण ही संघटना करणार असेल तर काही प्रमाणात परिस्थिती आशादायक असेल. मात्र, तालिबान आपल्या जुन्याच वळणावर गेला तर तो केवळ अफगाणिस्तानसाठी नव्हे तर जगासाठीच धोका असेल. कारण, तीन दशकांपूर्वी याच तालिबानी मनोवृत्तीतून जगभर दहशतवादाचा उद्रेक झाला होता. त्या उदेकाचे पडसाद आजही अनेकदा उमटताना पहावयास मिळतात. तालिबानच्या उदयानंतर आणि त्यापासून स्फूर्ती घेऊन काही काळातच अल् कायदा आणि त्यानंतर आयएसआयएस या जगव्यापी दहशतवादी संघटनांनी हैदोस घातला होता. आयएसआयएसने पहिल्या दोन वर्षांमध्ये सिरिया आणि इराकचा पुष्कळसा भाग बळकावून जगाच्या बहुतेक भागाच्या इस्लामीकरणाची महत्वाकांक्षा प्रगट केली होती. तसा एक नकाशाही त्या संघटनेने प्रसिद्ध केला होता. तथापि, वेळीच या संघटनेविरोधात अमेरिकादी बलाढय़ देशांनी कारवाई केली. त्यामुळे ही संघटना जवळपास नेस्तनाबूत झाली. अल् कायदा संघटनेलाही बऱयाच प्रमाणात नामोहरम करण्यात आले. आज या संघटनांचे नाव फारसे चर्चेत नसते. तरीही अनेक दहशतवादी संघटना अद्याप कार्यरत आहेत. पुन्हा सत्तेवर आलेल्या तालिबानपासून स्फूर्ती घेऊन या संघटनपैकी कोणती तरी एखादी नवीनच संघटना अल् कायदा किंवा आयएसआयएस बनण्याचे स्वप्न पाहणारच नाही, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तालिबानच्या हालचालींवर जगाची बारकाईने दृष्टी असावी लागणार आहे. कारण एका दहशतवादी संघटनेचे यश आणि जगाने त्याकडे पेलेली डोळेझाक तशा अन्य संघटनांना प्रेरणा देण्याचे काम करते. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा जगभरातील दहशतवादी संघटनांचे प्रेरणास्थान होऊ नये, याची दक्षता भारतासह साऱया जगाला बाळगावीच लागणार आहे. अन्यथा, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
Previous Articleकर्दनकाळ जो रुट पुन्हा भारताच्या मुळावर!
Next Article ‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment