मंत्री बाळासाहेब पाटील यांची भाजपावर सडकून टीका
प्रतिनिधी/ सातारा
सर्वसामान्य जनतेला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे होते. भाजपने पाच वर्षात कारभार मस्तीत आणि गुर्मीत केला होता. निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. आणि भाजप-सेनेची युती तुटली. या घडामोडीमुळेच राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले. पवारसाहेब जे खाते देतील त्या खात्याला न्याय देण्याचे मी मोठे निष्ठेने काम करेन, अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांनीही आपल्या खास शैलीत टीप्पणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री बाळासाहेब पाटील यांचा बैलगाडीची प्रतिकृती देवून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, काँग्रेसचे आनंदराव कणसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा समिंद्राताई जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, माझा मंत्रीमंडळात समावेश झाला त्यामुळे सत्कार होत आहे. विधानसभा निवडणूक झाली कुणाला वाटलं नव्हतं की तीन पक्षाची सत्ता येईल. भाजपला बाजूला ठेवायचा एवढाच विचार होता. भाजपाचा विचार न पटणारा होता. त्यांनी पाच वर्षात मस्तीत, गुर्मीत राज्य कारभार केला. त्यामुळेच पवार साहेबांनी प्रचार केला. निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजप युती होती. परंतु युतीचा भाजपावाल्यानी शब्द पाळला नाही. अनेक घडामोडी घडल्या. पवार साहेबांबरोबर मी फिरत होतो. अनेकांनी पवारसाहेब योग्य करत आहेत, असेच सांगितले.
मिळेल त्या खात्याला न्याय देणार
जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्याची माझ्यावर जबाबदारी दिली आहे. आम्हालाही भाजपाकडून ऑफर आली होती. पुढे संधी देतो असे सांगितले होते. परंतु संधी महत्वाची नाही तर विचार महत्वाचा आहे. माझ्यावर जबाबदारी पवारसाहेबांनी सोपवली आहे. साहेब देतील त्या खात्याला न्याय देण्याकरता प्रयत्न करणार आहे. गेल्या वेळेला भाजपाकडून प्रशासनच वापर मोठय़ा प्रमाणात केला गेला. आबांच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. राजकारण अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे नाही. फिरण्याची मला आवड आहे जिह्याच्या कुठल्या ही कानाकोपऱयात बोलवा तेथे येईन. सेल्फीसाठी कायम उपलब्ध आहे, त्यामध्ये आनंद असतो असे सांगत पवार साहेबांच्या सभेवेळी पाऊस आला. त्या पावसामुळे सभा देशाच्या कानाकोपऱयात गेली, असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांवर पवारसाहेबांचा विश्वास-रामराजे
रामराजे म्हणाले, बाबासाहेब पाटील फारच शिस्तप्रिय आहेत. पवार साहेबांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आपली ताकद एकीत आहे. या जिह्यात पार्टीची ताकद वाढेल. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. तीन पक्षाचे सरकार टिकते की नाही यावर मी आता बोलू शकत नाही. पण गावपातळीपर्यंत राजकीय आघाडीची समिकरणे ही बाळासाहेब पाटील यांच्या रुपाने आता ठरवली जातील. जिह्याची भौगोलिक रचना डोळ्य़ासमोर ठेवून काम होईल. मला त्यांना कोणतं खात मिळणार हे माहिती असून बोलू शकत नाही, असे सांगत ते म्हणाले, जिह्यात पाटबंधारेची कामे आहेत. डोंगरी भागातले विषय वेगळे आहेत. या सगळे पुढच्या पाच वर्षात काम करायचे आहे. राजकारणात महत्वकांक्षा असावी. मकरंद आबांचे भाषण मनाला भावले. आबा आपण काही काळजी करू नका जिह्यात काही तरी करू. असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब मंत्रीपद मिळाल्याचा आनंदच-मकरंद आबा
मकरंद आबा म्हणाले, माझ्यावतीने आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडावी, ही प्रार्थना करतो. गेले कित्येक वर्षे कराड परिसरातील लोकांचे स्वप्न होते. ते त्यांच्या रूपाने साकार झाले. पाच टर्म लोकप्रतिनिधी आहेत. अभ्यासू संयमी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या कुटुंबात पी. डी. साहेबांचा वारसा आहे. त्यांची नोंद गिनीज बुकात आहे. चव्हाण साहेबांचा आचार विचार यावर पी.डी.साहेब प्रेम करायचे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बाळासाहेब काम करत आहेत. कमी आणि मुद्याचे बोलतात. त्यांच्या मनात काय चालतं ते कळत नाही. आता कदाचित त्यांना सहकार खाते मिळेल. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. सह्याद्री कारखान्याचे पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. कारखाना कसा असावा आणि एकूण नियोजन हे त्यांच्याकडूनच पहावे. पश्चिम महाराष्ट्र उच्चांकी दर देणारा कारखाना आहे. त्यामुळे आमच्यातल्या नेते मंडळींचा राग त्यांच्यावर असतो. पवारसाहेबांचा फार मोठा विश्वास त्यांच्यावर आहे. मंत्रिपद हा त्यांचा अधिकार होता. माझं नाव चर्चेत होतं. मला मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही जेवढा आनंद बाळासाहेबांना झाला तेवढाच मकरंद आबांनाही झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार दीपक चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, विजय कणसे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक सुनील माने यांनी केले. आभार शबीर शेख यांनी मानले.