त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षांच्या नेत्यांना ऑफर
वृत्तसंस्था / अगरतळा
डाव्या पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन करताना त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रविवारी भाजपला गंगा नदीची उपमा दिली आहे. आमचा पक्ष गंगा नदीप्रमाणे असून यात स्नान (प्रवेश) करणाऱयांना सर्व पापांपासून मुक्ती मिळणार असल्याचे साहा यांनी म्हटले आहे. दक्षिण त्रिपुराच्या काकराबानमध्ये जनविश्वास सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले आहे.
चालू वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल भाजपला पूर्ण खात्री आहे. अद्याप स्टॅलिन आणि लेनिनच्या विचारसरणीत विश्वास ठेवणारे लोक भाजपमध्ये सामील होऊ शकतात, कारण भाजप हा गंगा नदीसारखा आहे. गंगेत जर तुम्ही पवित्र स्नान पेले तर तुमची सर्व पापं दूर होत असतात असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
रेल्वेचे डबे अद्यापही रिकामी आहेत, रिकामी डब्यात बस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हा सर्वांना इच्छितस्थळी पोहोचवतील असे उद्गार त्यांनी काढले आहेत. कम्युनिस्टांनी लोकशाहीच्या अंतर्गत मिळालेल्या अधिकारांची गळचेपी करत त्रिपुरात अनेक वर्षे शासन केल्याचा आरोप साहा यांनी राज्यातील विरोधी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उद्देशून केला आहे.
कम्युनिस्टांचे सरकार असताना राज्यात कुठलीच लोकशाही नव्हती. कम्युनिस्ट केवळ हिंसा आणि दहशतीच्या रणनीतिवर विश्वास ठेवायचे. दक्षिण त्रिपुरा जिल्हय़ात डाव्यांच्या शासनकाळात विरोधी पक्षांच्या 69 नेत्यांची हत्या करण्यात आली होती. काकराबान अपवाद नव्हते, तेथेही अनेक राजकीय हत्या झाल्या आहेत असे साहा म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून 5 जानेवारी रोजी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेली जनविश्वास रॅली विरोधी पक्षांना पराभवाची धूळ चारणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान त्रिपुरामध्ये अमित शाह यांच्याकडून ‘पन्नाप्रमुख’ संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली होती. याचमुळे 25 वर्षांपासूनचा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला भेदता आला होता. यंदाही जनविश्वास रॅली विरोधी पक्षांना पराभूत करण्यास मोठी भूमिका बजावणार असल्याचा दावा मुख्यमंत्री साहा यांनी केला आहे.