वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याच्या मते, सध्याचा भारतीय गोलंदाजी विभाग हा त्याने पाहिलेला सर्वोत्तम आहे आणि त्याची तुलना 2000 च्या सुऊवातीच्या संघातील ‘फॅब फाईव्ह’ फलंदाजांशी केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या भारतीय वेगवान त्रिकूटाने आणि रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या फिरकी जोडीने मिळून विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील संघाच्या नऊ विजयांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे आणि विरोधी फलंदाजांना गोंधळवून टाकलेले आहे, असे तो म्हणतो.
सध्याचा गोलंदाजी विभाग हा मी पाहिलेला सर्वोत्तम भारतीय गोलंदाजी विभाग आहे. वेळोवेळी महान भारतीय गोलंदाज आलेले आहेत, परंतु एक विभाग म्हणून विचार केल्यास हा सर्वोत्तम आहे, असे हुसेनने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले आहे. ‘जर बुमराहने बळी मिळविले नाहीत, तर सिराज मिळवेल. सिराजलाही नाही मिळाले, तर शमी मिळवेल. जर त्यालाही ते जमले नाही, तर दोन फिरकीपटू येतील आणि फलंदाजाला बाद करून दाखवतील’, असे त्याने म्हटले आहे.
हुसेनने सध्याच्या भारताच्या पाच गोलंदाजांची तुलना सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण या ‘फॅब फाईव्ह’ फलंदाजांशी केली आहे, ज्यांनी या सहस्रकाच्या सुऊवातीच्या काळात जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. ‘पूर्वी फलंदाजीत ‘फॅब फाईव्ह’ असायचे, आता ते गोलंदाजीत आहेत’, असे हुसेनने पुढे म्हटले आहे.