वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे 2021 पर्यंत लांबणीवर टाकली गेलेली भारतातील 17 वर्षे वयोगटाखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय फिफाने बुधवारी जाहीर केला. या स्पर्धेची भरपाई म्हणून 2022 आवृत्तीच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. फिफा कार्यकारिणीने यावेळी जागतिक स्तरावरील कोव्हिड-19 ची एकंदरीत परिस्थिती व फुटबॉलवरील त्याचा परिणाम याचा आढावा घेतला.
फिफाने भारतातील यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेबरोबरच कोस्टारिकात आयोजित यू-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करावी लागत असल्याचीही येथे घोषणा केली. भारताप्रमाणेच कोस्टारिकालाही 2022 आवृत्तीचे यजमानपद बहाल केले गेले आहे.
‘पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे या दोन्ही स्पर्धा 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. नंतर त्या एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे अद्याप पूर्वतयारीला देखील सुरुवात नाही आणि ही स्पर्धा आणखी लांबणीवर टाकणे देखील शक्य नाही. त्यामुळे, या दोन्ही स्पर्धा रद्द करत आहोत आणि त्याऐवजी 2022 आवृत्तीचे यजमानपद या दोन्ही देशांना बहाल करत आहोत’, असे फिफाने पत्रकाद्वारे नमूद केले.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दि. 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत भारतातील 5 शहरात फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार होती. पुढे ती दि. 17 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत लांबणीवर टाकली गेली. पण, कोव्हिड-19 मुळे कॉन्फेडरेशन्स ऑफ आफ्रिका, उत्तर व मध्य अमेरिका, तसेच दक्षिण अमेरिकेत अगदी त्यांच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात देखील झालेली नाही.
युरोपने (युफा) मागील महिन्यात पात्रता स्पर्धा रद्द केली आणि स्पेन, इंग्लंड व जर्मनी या मानांकनानुसार अव्वल संघांना पुढे चाल दिली. ओशेनिया कॉन्फेडरेशनने देखील हाच कित्ता गिरवत आपल्या प्रांतातून न्यूझीलंडची निवड केली. जपान व उत्तर कोरिया हे 2019 एएफसी यू-16 महिला चॅम्पियनशिपचे अनुक्रमे जेते, उपविजेते ठरले असल्याने ते प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेसाठी यापूर्वीच पात्र ठरले आहेत.
फिफाचा निर्णय
- 2021 ऐवजी 2022 यजमानपदाचे हक्क बहाल
- कोव्हिड-19 च्या संकटाचा आणखी एक फटका