नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात काही ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेल काही काळ स्थगित देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून निशाणा साधला आहे. भारताच्या या अशा संभ्रमित आणि अनिश्चित लसीकरण मोहिमेसाठी कोण जबाबदार आहे?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
प्रियांका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील सध्याच्या लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली आहे. केंद्रानं लस खरेदी, वितरणाबाबत सुरुवातीला सर्व जबाबदारी घेतली. पण जशी कोरोनाची दुसरी लाट देशात सुरू झाली, तसं केंद्र सरकारने ही जबाबदारी राज्य सरकारांकडे द्यायला सुरुवात केली. जर्मनी, अमेरिका या देशांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा स्वीकार केला. तिथे केंद्र सकरारने लसी खरेदी केल्या आणि राज्यांना त्या लसी फक्त वितरीत करण्याची जबाबदारी दिली. पण मग मोदी सरकारने असं का केलं नाही?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
भारत हा जगात लसींचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. मात्र, तरीही आज देशातली फक्त ३.४ टक्के लोकसंख्या पूर्णपणे लसीकृत आहे. भारताच्या या अशा संभ्रमित आणि अनिश्चित लसीकरण मोहिमेसाठी कोण जबाबदार आहे?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी देखील देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.