वृत्तसंस्था/ हांगझोयू, चीन
येथे सुरू झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोईंग या क्रीडाप्रकारात भारतीय नौकानयनपटूंनी आशादायक सुरुवात केली. भारताच्या पुरुष व महिला संघांनी जिगरबाज प्रदर्शन केले. अर्जुन लाल जट व अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये 6:27.45 मि. अवधी घेत दुसरे स्थान मिळविले.
अन्य एक जोडी सतनाम सिंग व परमिंदर सिंग यांनीही हीटमध्ये 6:27.01 मि. अवधी नोंदवला. दोघांनीही रिपेचेज फेरीत स्थान मिळविले असून अंतिम अ फेरीसाठी ते प्रयत्न करतील. चीनच्या झियु लियू व झँग लियांग यांच्यानंतर भारतीय जोडीने स्थान मिळविले.
दरम्यान, महिला रोईंग संघानेही सकारात्मक सुरुवात केली. किरण व अंशिका भारती यांनी महिलांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये 7:27.57 मि. अवधी घेत पुढील फेरीसाठी स्थान निश्चित केले. अंतिम फेरी गाठण्यासाठी ते आता रिपेचेज फेरीत भाग घेतील. पुरुषांच्या डबल्स कॉक्सलेस प्रकारात भारताच्या बाबुलाल यादव व लेख राम यांनी 6:42.59 मि. वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेत सेलिंगचे एकूण 14 प्रकार असून त्यापैकी 12 प्रकारांत भारताने भाग घेतला आहे.