संगीत कलाकार संघ-स्वर मल्हारतर्फे संगीता बांदेकर यांचा गायनाचा कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
जय शारदे वागेश्वरी, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, आज कुणी तरी यावे, विकत घेतला श्याम यासारखी सुंदर भावगीते आणि नाटय़गीतांनी रसिकांची शनिवारची संध्याकाळ सुश्राव्य झाली. संगीत कलाकार संघ व स्वर मल्हार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी संगीता बांदेकर यांचे गायन आयोजित करण्यात आले होते.
वरील गीतांसह काटा रुते कुणाला, गर्द सभोवती, मजवरी तयांचे प्रेम खरे याबरोबरच बचपन की मोहब्बत को, चांद फिर निकला, हम प्यार में जलने वालों को, आयेगा आयेगा आनेवाला आयेगा ही हिंदी गीते, कजरा मोहब्बत वाला ही कव्वाली त्यांनी सादर केली. त्यांच्या सुरेल आवाजाला तितकीच अनुरूप व उत्कृष्ट अशी तबलासाथ अंगद देसाई व संवादिनी साथ सारंग कुलकर्णी यांनी दिली. भावगीत, नाटय़गीत, कव्वाली अशा गीतांच्या वैविध्यांमुळे श्रोत्यांनीही या मैफलीला उत्स्फूर्त दाद दिली. प्रारंभी मुकुंद गोरे यांनी स्वागत करून संगीता बांदेकर व वादकांचा परिचय करून दिला. सुधीर जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. सुधीर जोशी यांनी 80 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.