शिवगणाराधनेत धार्मिक विधी, कुटुंबीयांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसांपूर्वी निधन झालेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या विश्वेश्वरय्यानगर येथील निवासस्थानी शुक्रवारी कुटुंबीयांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी धार्मिक विधीही पार पडले. भावपूर्ण वातावरणात शिवगणाराधने कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गुरुवारी नवी दिल्ली येथील द्वारका सेक्टरमध्ये असलेल्या रुद्रभूमीत त्यांना दफन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगल अंगडी, त्यांच्या दोन्ही कन्या, जावई, त्यांचे जवळचे नातेवाईक उद्योगमंत्री जगदीश शेट्टर बेळगावला पोहोचले. त्यानंतर पुरोहितांकरवी तिसऱया दिवसाच्या धार्मिक विधी पार पडल्या.
कुटुंबीय व नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणात सुरेश अंगडी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हय़ातील राजकीय नेते व वरि÷ अधिकाऱयांनीही विश्वेश्वरय्यानगर येथील निवासस्थानी भेट देऊन सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली. प्रामुख्याने आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, स्मार्ट सिटीचे एमडी शशिधर कुरेर, पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी आदरांजली वाहिली.
दिल्ली येथे अंत्यविधीसाठी बेळगाव येथील जंगम पुरोहितांना नेण्यात आले होते. शुक्रवारीही धार्मिक विधीत पुरोहितांनी भाग घेतला होता. विश्वेश्वरय्यानगर येथील त्यांचे निवासस्थान व कार्यालयावर शुक्रवारी दिसऱया दिवशीही शोककळा पसरली होती. राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत होते.