प्रतिनिधी/ बेळगाव
छोटे, मोठी कामे करुन घेतल्यानंतर मटण जेवणाला बोलाविले नाही म्हणून चौघा जणांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापैकी उद्यमबाग पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून दीड लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ईश्वर शिवरायप्पा उदगट्टी (वय 28, रा. राजारामनगर, उद्यमबाग), संतोष उर्फ बल्या वसंत बेटगेरी (वय 37, रा. दत्त गल्ली, वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
चोरीच्या प्रकारानंतर केवळ चार दिवसांत दोघा जणांना अटक करण्यात आले. या पथकात कांतेश सौदत्ती, तवनाप्पा कुंचनूर, माळाप्पा पुजारी, शशिकुमार गौड्र, जगदीश हादीमनी आदींचा समावेश आहे. या टोळीतील आणखी दोघे जण फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांकडून मंगळसूत्र, कर्णफुले व चोरीसाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी हनुमानवाडी येथील राजाराम कृष्णा सुतार यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी सोन्या, चांदीचे दागिने पळविले होते.
पोलिसांनी या प्रकरणी ईश्वर व संतोष यांना अटक करुन त्यांची कसून चौकशी केली असता मटण जेवायला बोलाविले नाही म्हणून राजाराम यांच्या घरी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. राजाराम यांची पत्नी एका खानावळीत कामाला जाते. हे दांपत्य यांच्याकडून कामे करुन घेत होती. एका तरुणाकडे पैसे देवून त्यांनी मटण मागविले. त्यावेळी जेवणाला बोलाविले नाही म्हणून त्याचा राग काढण्यासाठी ही चोरी केली आहे.