वार्ताहर/ निपाणी
कोणतीही शासकीय योजनेविषयी जागृती मोहीम राबविताना तेथील नागरिकांना अवगत असणाऱया भाषेचा आधार घेतला पाहिजे. हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास जागृती मोहिमेसाठी खर्च होऊनही ती अपयशी ठरते. हे सर्व माहित असूनही निपाणी नगरपालिका मात्र आता जागृतीसाठीही कानडीचा वरवंटा मराठी भाषिकांवर फिरवत आहे. मतदार नोंदणी उपक्रमात लावण्यात आलेल्या फलकातून हा प्रकार पुढे आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून नवमतदार नोंदणीसाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची मतदार यादीत नाव नोंदणी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक बुथनिहाय बीएलओ संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे घेत आहेत. नगरपालिका कार्यालयातही नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. तीन दिवस सुरु असणाऱया या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पालिका कार्यालयासमोर फलक उभारण्यात आला आहे. पण हा फलक कानडीतून असल्याने जागृती मोहीम कुचकामी ठरत आहे. कानडीबरोबरच मराठीतूनही फलक प्रसिद्ध केला असता तर बहुभाषिक असणाऱया मराठी भाषिकांचीही जागृती झाली असती, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.
मतदार नोंदणी हा निवडणूक आयोगाचा उपक्रम आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळणे आवश्यक आहे. यासाठी जागृतीतून नोंदणी झाल्यास येत्या काळात होणाऱया निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोग मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागृती मोहीम राबविते. यादरम्यान होणारी जागृती मतदारांना समजेल अशा भाषेतूनच केली जाते. पण मतदार नोंदणीसाठी मात्र फक्त कानडीचा वरवंटा कशासाठी? असा सवाल पुढे येत आहे.