वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा कसोटी सलामीवीर मयांक अगरवालला रणजी करंडक सामन्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. कर्नाटक व मुंबई यांच्यातील हा महत्त्वाचा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कामाचा ताण नियोजित करण्याचे बीसीसीआयचे धोरण असून त्यानुसार अगरवालला विश्रांती दिली जाणार आहे. तो नंतर भारत अ संघातून न्यूझीलंड दौऱयावर जाणार आहे.
भारत अ संघाचा हा शॅडो दौरा असून त्यात दोन लिस्ट ए सराव सामने, तीन अनधिकृत वनडे सामने आणि दोन चारदिवशीय कसोटी सामने हा संघ खेळणार आहे. त्यानंतर अगरवाल वरिष्ठांच्या कसोटी संघात दाखल होणार आहे. हा दौरा 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ 10 जानेवारीला प्रयाण करणार असून कर्नाटकाचा सलामीवीर अगरवालही त्यांच्यासमवेत जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने अगरवालला रणजी सामन्यातून सुटका देण्याची सूचना कर्नाटकाला केली आहे, असे सांगण्यात आले. मात्र अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ हे देखील भारत अ संघाचे सदस्य असले तरी ते या रणजी सामन्यात मुंबईतर्फे खेळणार आहेत. पृथ्वी शॉ व अगरवाल वनडे व कसोटी दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत तर रहाणे व चेतेश्वर पुजारा कसोटी मालिकेच्या तयारीसाठी दुसऱया चार दिवसीय सामन्यात भाग घेणार आहेत. अगरवालच्या जागी कर्नाटक संघात रविकुमार समर्थला सामील करण्यात आले आहे.