वृत्तसंस्था/लखनौ
भारतीय महिला मल्लांसाठी येथे 1 सप्टेंबरपासून आयोजित केलेले राष्ट्रीय कुस्ती सराव शिबीर कोरोना महामारी समस्येमुळे पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने रविवारी जाहीर केला आहे.
कुस्ती फेडरेशनतर्फे महिला मल्लांसाठी सदर सराव शिबीर सुरूवातीला ऑगस्ट महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात सुरू करण्यात येणार होते पण कोरोनाच्या चिंताग्रस्त परिस्थितीमुळे हे शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर शिबीर सप्टेंबरच्या 1 तारखेपासून सुरू केले जाणार होते पण लखनौतील कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्याने पुन्हा हे शिबीर दुसऱयांदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. मात्र सोनेपत येथे पुरूष मल्लांचे सराव शिबीर ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतले जाईल. पुढीलवर्षी होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगट ही एकमेव महिला मल्ल आहे.