जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) शिफारस आहे की सामान्य जनतेला मास्क वापरायची गरज नाही. केवळ सुरक्षित अंतर (सोशल डिस्टंन्सिग) व हातांची स्वच्छता (हॅण्ड हायजीन) राखणे पुरेसे आहे. फक्त डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, कोरोना संशयित रुग्णांची देखभाल करणारे यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी तर श्वसनमार्गासंबंधी तक्रार असलेल्या रुग्णांनी दुसऱयांना लागण होऊ नये म्हणून मास्क वापरावे. मास्क वापरायचा झाला तर कोणता वापरावा? कापडी, सर्जिकल मास्क का एन-95? मुळात या वेगवेगळय़ा मास्कमध्ये मूलभूत फरक काय? प्रत्येक मास्कचे फायदे कोणते? तोटे कोणते? यासंबंधी शास्त्रीय माहिती सर्वसामान्य लोक सोडाच पण आरोग्याशी निगडित लोकांमध्येही नाही. आमचे एक सहकारी डॉक्टर, त्याने कसाबसा ब्लॅकने एक एन-95 मिळविला, त्यांच्यापुढे यक्षप्रश्न होता, हा फेकून न देता पुनः पुन्हा कसा वापरता येईल? म्हणजे डिस्पोजेबलचा रियुजेबल कसा करता येईल? सर्वसामान्य मास्क हे दोन प्रकारचे असतात 1) कापडी मास्क आणि 2) सर्जिकल मास्क. काही स्पेशल मास्क असतात. ते चेहऱयावर फिट बसतात, मास्कच्या कडांमधून हवा आत बाहेर जात नाही त्यांना वैद्यकीय परिभाषेत मास्क न म्हणता ‘रेस्पिरेटर’ म्हणतात. एन-95, एन-99, एन-100 हे खरंतर रेस्पिरेटर या जातकुळीतले. रेस्पिरेटरचे गाळण क्षमतेनुसार, त्यात वापरलेल्या मटेरियलच्या दर्जानुसार व जास्तीच्या सोयीनुसार विविध प्रकार आहेत. एन-95 रेस्पिरेटर हे 0.3 मायक्रानपेक्षा जास्त साईझचे 95% कण (particles) ट्रप करतात, एन-95 हेच काम जास्त परिणामकारकरित्या म्हणजे 99% कण ट्रप करतात. शिवाय मास्क वर N, R किंवा P अशी अक्षरे छापलेली असतात. N म्हणजे Not oil proof, R म्हणजे Oil resistant, P म्हणजे Oil proof (याचाच अर्थ एन 95 मास्क ऑइल प्रुफ नाही, एकदा ओला झाला की फेकून द्यावा लागतो) तुम्ही पाहिले असेल की काहीजणांच्या मास्कला व्हॉल्व असते, ही सायकल्सच्या वन वे व्हॉल्वसारखे काम करते, म्हणजे आतली हवा बाहेर जाते पण बाहेरील हवा आत येत नाही. याचा फायदा काय तर तुम्हाला (CO2 साठून न राहिल्यामुळे) फार घुसमटल्यासारखे होत नाही. शिवाय आतमधली उष्णता बाहेर फेकली गेल्याने गरम होत नाही. जसा चांगल्या प्रतिच्या मालावर ISI शिक्का असतो तसाच मास्क वर NIOSH किंवा NPPTLअसा शिक्का असेल तर त्याचा दर्जा उच्च प्रतीचा आहे असे समजावे. नाहीतर बोगस मास्क पुरवणाऱया कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. एवढेच नव्हे तर चीनने पाकिस्तानला चक्क ‘ब्रा’ पासून बनवलेले स्पाँज मास्क निर्यात केले आहेत. त्यामुळे मास्क खरेदी करताना त्याचा दर्जा पाहूनच खरेदी करा.
कापडी मास्क हे विणलेल्या धाग्यापासून तयार केलेले असल्यामुळे pore size मोठा आहे. याउलट सर्जिकल मास्क हे न विणलेल्या पॉलिप्रोपीलिन मटेरियलपासून बनवलेले असल्यामुळे त्यांची गाळण क्षमता अधिक आहे. कापडी मास्क हे विषाणूपासून सुरक्षा पुरविण्यात त्यादृष्टीने कुचकामीच म्हणायचे. एखाद्या मास्कवर त्याच प्रकारच्या दुसऱया मास्कचे आवरण घालून (डबल मास्क) वापरले तर फक्त 2%नी जादा संरक्षण मिळते, याउलट श्वासाला अवरोध व अस्वस्थपणा कितीतरी पटीने वाढतो. त्यामुळे त्याचीही शिफारस करणे उचित नाही.
मास्क नेहमीच वापरावा का?
WHO ची मार्गदर्शक तत्त्वे जरी वेगळी असली तरी असे निदर्शनास आले आहे की पूर्व आशियातले काही देश, जे सतत, नियमितपणे मास्क (रुटीनली) वापरतात त्यांच्यामध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण 75% ने कमी आहे. शिवाय सध्याचे स्टॅटिस्टिक्स बोलके आहे. सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, जपान या देशातले लोक नेहमीच मास्क वापरत असल्यामुळे त्यांच्याकडे कोरोना विषाणु हाहाकार (जसा इटली, स्पेन, अमेरिकामध्ये माजला तसा) माजवू शकला नाही.
सध्याच्या साथीत मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी जाणे म्हणजे हेल्मेट न वापरता मोटारसायकल चालवण्यासारखे आहे. जरी WHO ची मार्गदर्शक तत्त्वे वेगळी असली तरी प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरणेच इष्ट. त्यामुळे हवेत तरंगणाऱया विषाणूच्या ड्रॉपलेटपासून (aerosolized virus droplets) संरक्षण मिळेल सध्या जरी कोरोना हवेतून पसरत नाही असा प्रवाद असला तरी रोज नवनवीन सिद्धांत प्रसिद्धीस येत आहेत. नुकताच लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील प्रति÷ित जर्नलने प्रसिद्ध केले आहे की कोरोना संक्रमित व्यक्तीच्या वि÷sतून 30 दिवसपर्यंत निर्गमित होतो (Faeco-oral route). WHO च्या शिफारसी प्रत्येक देशाने आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीनुरूप बदल करून स्वीकारायच्या असतात. शिवाय WHO चे डायरेक्टर जनरल डॉ. टेड्रॉस घेब्रियेसस हे चीनच्या निर्णायक मतावर चेअरमनपदी निवडून आल्यामुळे ते चीनविषयी बोटचेपी भूमिका घेतात असा युरोपियन राष्ट्रांचा आक्षेप आहेच.
मास्क कसा परिधान करायचा? सर्वप्रथम हात साबणाने वा सॅनिटीझरने स्वच्छ धुवावेत. नंतर मास्कचा दर्शनी भाग नाक व तोंडावर घट्ट बसेल व साईडने हवा जाणार नाही असा बसवायचा व पट्टे/दोरी कानामागे अडकवायच्या. तद्नंतर मास्कच्या पुढील भागास अजिबात हात लावू नये. मास्कची विल्हेवाट कशी लावाल? वापरलेला मास्क पुढील भागास हात न लावता सर्वप्रथम कानामागून बाहेर काढून, डिसइंफेक्टिव स्प्रे मारून झाकण असलेल्या डस्ट बिनमध्ये टाकावा वा जाळून खोल खड्डय़ात पुरावा. डॉक्टर लोक हे मास्क लाल रंगाचे लेबल असलेल्या बायोमेडिकल वेस्ट बकेटमध्ये टाकून विल्हेवाट लावू शकतात. विल्हेवाट लावल्यावर पुन्हा सॅनिटायझरने हात धुणे तितकेच आवश्यक आहे. कापडी मास्क गरम पाण्यात (60 डी. से.) धुवून, उन्हात वाळवून, इस्त्री करून पुन्हा वापरू शकता. सर्जिकल मास्क एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावा.
एन95 पुन्हा वापरता येईल का? एन 95 मास्क एकदाच वापरून फेकून द्यावा पण प्रगतिशील व अप्रगत देशांमध्ये ही गोष्ट प्रॅक्टिकल नाही. पण 70 डिग्री तपमानात 30 मि. ओव्हनमध्ये ठेवणे, 3 दिवस उन्हात टांगून चौथ्या दिवशी वापरणे किंवा ऑटोक्लेव्ह करणे ह्या गोष्टींचा अवलंब करून मास्क पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी CDC ने तात्विक मान्यता दिली आहे. आपल्या लक्षात आले असेलच की योग्य मास्क निवडण्याएवढेच तो योग्यरित्या परिधान करणे महत्त्वाचे व त्याहूनही महत्त्वाचे त्याची योग्य विल्हेवाट लावणे. अन्यथा नुकत्याच चीनहून प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे फेकून दिलेले मास्क हे विषाणूंचे आगर बनतील कारण मास्कच्या बाह्य आवरणावर विषाणु 3 दिवसपर्यंत जिवंत राहू शकतात. मास्कचा नियमित वापर करणाऱया पूर्व आशियाकडील देशांमध्ये कोरोना जास्त हातपाय पसरू शकला नाही.