रणजी चषक स्पर्धा : दुसऱया डावातही फलंदाजाची निराशा
वृत्तसंस्था/ मुंबई
कर्नाटकविरुद्ध सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील लढतीत यजमान मुंबई संघ चांगलाच अडचणीत सापडला असून दुसऱया डावात खेळताना त्यांची 5 बाद 109 अशी घसरगुंडी उडाली आहे. मुंबईकडे आता 85 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस सर्फराज खान 53 धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, कर्नाटकचा पहिला डाव 218 धावांवर संपुष्टात आला.
प्रारंभी, कर्नाटकने 3 बाद 79 या धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. डावातील पहिल्याच षटकांत कर्णधार करुण नायरला दासने बाद करत कर्नाटकला चौथा धक्का दिला. यानंतर, आर. समर्थ व श्रेयस गोपाल यांनी पाचव्या गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी केली. समर्थने संयमी खेळी साकारताना 19 चौकारासह 86 धावा फटकावल्या. गोपालने 31 धावांचे योगदान दिले. या जोडीला फिरकीपटू आतर्डेने लागोपाठ बाद करत कर्नाटकला जोरदार धक्का दिला. यानंतर, बीआर शरथने 54 चेंडूत 46 धावांची वादळी खेळी साकारल्यामुळे कर्नाटकला दोनशेचा टप्पा गाठता आला. इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे कर्नाटकचा पहिला डाव 68.5 षटकांत 218 धावांवर संपुष्टात आला व त्यांना 24 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मुंबईकडून शशांक आतर्डेने 5 तर शाम्स मुलाणीने 3 गडी बाद केले.
दुसऱया डावातही मुंबईचे फलंदाज ढेपाळले
दुसऱया डावात खेळताना सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे मैदानावर उतरु शकला नाही. सलामीला आलेल्या आदित्य तरे व अजिंक्य रहाणे या जोडीने सपशेल निराशा केली. तरे 6 धावा काढून बाद झाला. रहाणेला मिथुनने 1 धावांवर पायचीत केले. पुढील षटकांत सिद्धेश लाडलाही मिथुनने तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी साकारणारा सुर्यकुमार यादव 10 धावा काढून परतला. यानंतर, सर्फराज खान व शाम्स मुलाणी या जोडीने 83 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सर्फराजने 92 चेंडूत 6 चौकार व 2 षटकरासह नाबाद 53 धावांची खेळी साकारली. मुलाणीने त्याला 31 धावा करत चांगली साथ दिली. दिवसातील शेवटच्या षटकात मात्र मुलाणीला कौशिकने बाद करत कर्नाटकला पाचवे यश मिळवून दिले. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 36 षटकांत 5 बाद 109 धावापर्यंत मजल मारली होती. पराभव टाळण्यासाठी त्यांना धावांचा डोंगर उभा करावा लागेल.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 194 व दु.डाव 36 षटकांत 5 बाद 109 (सुर्यकुमार यादव 10, सर्फराज खान नाबाद 53, शाम्स मुलाणी 31, मिथुन 3/52, कौशिक 2/11). कर्नाटक पहिला डाव 68.5 षटकांत सर्वबाद 218
महाराष्ट्र दारुण पराभवाच्या मार्गावर
नवी दिल्ली : सेनादलाविरुद्ध सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेतील सामन्यात महाराष्ट्रा दारुण पराभवाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राला 44 धावांत गुंडाळल्यानंतर सेनादलाने रवी चौहानचे अर्धशतक व अनुप शर्मा, विकास हातावाला यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 285 धावा केल्या व 241 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर, दुसऱया डावात खेळताना महाराष्ट्राची घसरगुंडी उडाली असून दुसऱया दिवसअखेरीस 34 षटकांत 5 बाद 93 धावा जमवल्या होत्या. अद्याप ते 148 धावांनी पिछाडीवर असून डावाने पराभव टाळण्यासाठी तिसऱया दिवशी महाराष्ट्राच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दिवसअखेरीस नौशाद शेख 40 तर विशांत मोरे 33 धावांवर खेळत होते.
इतर सामन्यांचे निकाल –
- झारखंड 259 वि जम्मू व काश्मीर 3/153 (रांचीमध्ये)
- हरियाणा 123 वि छत्तीसगड 119 (रायपूरमध्ये)
- केरळ 164 वि हैदराबाद 8/193 (हैदराबादमध्ये)
- पंजाब 313 वि दिल्ली 4/195 (मोहालीमध्ये)
- राजस्थान 151 व 2/23 वि आंध्र प्रदेश 257
- हिमाचल प्रदेश 175 वि मध्य प्रदेश 7/364 (धरमशालामध्ये)
- बडोदा 201 व 98 वि रेल्वे 99 वि 0/1 (बडेद्यामध्ये)
- आसाम 294 वि उत्तराखंड 4/32 (डेहराडूनमध्ये)
- मणिपूर 106 व 4/21 वि गोवा 553/5 घोषित