मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज (९ सप्टेंबर) झालेल्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावलं नाही अशी चर्चा असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार भेटीवर भाष्य केलं आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार भेटीवर बोलताना “राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. आपल्या काही समस्या मांडत असतात. त्यांच्या ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल. म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार पुढे म्हणाले की, “शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. तर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून अनेकदा पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आज देखील लोकांच्या काही समस्यांवर निर्णय घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. शरद पवार ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरिता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.”