प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अनेक घटकांवर झाला तसा तो अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवरही झाला. या व्यक्तींना परत गोव्यात आणण्यासाठी सरकारदरबारी देखील प्रयत्न झाले खरे परंतु गोव्यातील प्रख्यात मराठी साहित्यिक आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे गुरु प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे चक्क गेले दोन महिने पुण्यात अडकून पडले असून आपल्याला गोव्यात परत न्या यासाठी त्यांचा आटापिटा अद्याप चालू आहे.
गोव्यातील प्रख्यात समीक्षक, उत्कृष्ट वक्ते आणि मराठी साहित्यिक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकून पडले आहेत. अगोदर एका साहित्यिक कार्यक्रमामुळे व त्यानंतर आपल्याच एका नातेवाईकांकडे जाऊन दुसऱया दिवशी गोव्यात परतणार तोच लॉकडाऊनमुळे त्यांना पुणे सोडता येईना. पुण्यात कोविड 19 ची साथ जोरदार आहे. त्यामुळे लॉकडाऊन अंतर्गत आजही तेथे कडकपणे अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे.
प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे दुसरे तिसरे कोणी नसून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गुरु आहेत. त्यांच्या पीईएस महाविद्यालयात त्यांनी त्यांना शिकविले होते. अशी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती देखील लॉकडाऊनच्या या काळात केवळ 430 किलो मीटर अंतरावर असलेल्या पुणे शहरात अडकून पडली आहे. प्राध्यापक महाशयांनी आतापर्यंत अनेकांना विनंती केली आपल्याला एकदाचे गोव्यात घेऊन चला. त्यांची पत्नी, त्यांची मुले, सुना नातवंडे हे सर्व गोव्यात आहेत आणि आपण मात्र पुण्यात अडकून पडलेलो आहे. याची त्यांना सातत्याने खंत होत आहे.
आतापर्यंत अनेकवेळा त्यांनी पुणे जिल्हा कार्यालय तसेच गोव्यातही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपली कैफीयत मांडलेली आहे. परंतु थोडे दिवस थांबा, थोडे दिवस थांबा असे सूर त्यांना ऐकायला मिळाले. अलीकडे लॉकडाऊनच्या नियमावलीमध्ये थोडी दुरुस्ती करण्यात आल्यानंतर प्राध्यापक महाशयांना गोव्यात जाण्याचे वेध अधिक तीव्रतेने लागले. नव्याने अर्ज करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देखील एका अधिकाऱयाने प्रयत्न केले. गोव्यात जाण्याचेही निश्चित झाले, मात्र त्यांना घेऊन जाणारी बस मात्र तीन दिवस गायब झाली.
कोणी दखल घेईल का ?
या दरम्यान त्यांना गोव्यात परत जाण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱयांनी दिलेली मुदतही संपुष्टात आली. प्रा. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, आता मात्र हद्दच झाली, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. काहीतरी करा आणि आपल्याला गोव्यात घेऊन जा, अशी आर्जव गेली दोन महिने पुण्यात दिवस कंठीत असलेले प्रा. कुष्णाजी कुलकर्णी करीत आहेत. या प्राध्यापकांची आता तरी कोणी दखल घेईल का?