साहित्यिक पत्रकार राजू भिकारो नाईक यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पर्वरी
माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहेच, त्याचबरोबर देव, देश व धर्माशी निगडीत तसेच कला व संस्कृती क्षेत्रातील नाटक, भजन, कीर्तन, गायन, वादन तसेच अन्य गुणही असले तर त्याचे जीवन अधिक आनंदमय होऊ जाते. मुलांमध्ये असलेल्या कलांगुणांना पालकांनी, शिक्षकांनी तसेच त्यांच्या मित्रमंडळीने प्रोत्साहन द्यायला हवे, जेणेकरुन आईवडिलांबरोबरच गावाचाही गौरव वाढेल, असे प्रतिपादन साहित्यिक तथा दै. तरुण भारतचे उपसंपादक राजू भिकारो नाईक यांनी केले.
सावळे – पिळर्ण येथील श्री महारुद्र आमेकरनाथ देवस्थानच्या वर्धापनदिन सोहळय़ानिमत्त आयोजित करण्यात आलेल्या अखिल गोवा सिने नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर माजी जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, समाजकार्यकर्ते तथा कार्यक्रमाचे पुरस्कर्ते देवानंद अर्जुन नाईक, पंच अमरनाथ गोवेकर, श्री महारुद्र आमेकरनाथ देवस्थानचे अध्यक्ष योगानंद नाईक, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष विलास सावळेकर, अरुण नागवेकर, नितीन कोरगांवकर व सिमेपुरुषकर उपस्थित होते.
सुरुवातीस अथर्व सावळेकर, अथर्व कांदोळकर, गौरव सावळेकर, कार्तिक मालवणकर व इतरांनी मान्यवरांचे पुष्पुगच्छ देऊन स्वागत करण्यात आले. समईप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रुपेश नाईक म्हणाले की या देवस्थानात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने समाजाला त्याचा चांगला फायदा होत असतो. देवानंद नाईक म्हणाले की देवस्थान समिती खूप परिश्रम घेऊन उत्सव आयोजित करीत असते. समाजाला पुरक अशा कार्यक्रमांचे आायोजन करणे ही या देवस्थानची खासीयत असून अशा सामाजिक उपक्रमांना आपले सदोदीत सहकार्य लाभेल, असेही ते म्हणाले.
अमरनाथ गोवेकर, नितीन कोरगावकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन निवृत्त मुख्याध्यापक अरुण नागवेकर यांनी केले.