प्रतिनिधी/ काणकोण
कोरोना महामारीच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका काणकोण तालुक्यातील मोटारसायकल पायलट, रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना बसला आहे. या तालुक्यात केवळ रिक्षा आणि मोटारसायकलीच्या भाडय़ाने फेऱया मारून आपली उपजीविका चालविणारे 100 पेक्षा अधिक चालक आहेत.
चावडी, पाळोळे, होवरे, पाटणे, राजबाग, आगोंद या ठिकाणी पर्यटन मोसमात टॅक्सीचा व्यवसाय तेजीत चालत असतो. परंतु पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. येथील हॉटेल्स ओस पडली आहेत. लोकांची वर्दळ पूर्णरीत्या बंद आहे. सगळी मार्केट्स बंद आहेत. वाहतूकच पूर्ण बंद असल्यामुळे सर्व मोटारसायकली, रिक्षा आणि टॅक्सी पार्क करून ठेवण्यात आल्या असून या व्यवसायातील लोकांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहेत. कित्येकांचे बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. चावडीवरील मोटारसायकल आणि रिक्षा स्टँडचा ताबा सध्या पोलिसांनी घेतला आहे. एरव्ही दहा-पंधरा मोटारसायकली, पाच-सहा टॅक्सी आणि रिक्षा असणारा हा स्टँड आता अक्षरशः ओस पडला आहे.