आमदार जोशुआ डिसोझा यांची माहिती
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथे नव्याने बांधण्यात येणाऱया कदंब बसस्थानक सुमारे 3 कोटी रुपये खर्चुन पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार तथा जीएसआयडीसीचे चेअरमन जोशुआ डिसोझा यांनी अधिकाऱयांसमवेत या जागेची पाहणी केल्यावर पत्रकारांना दिली. सुमारे 10 हजार चौ.मीटरमध्ये पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यात येणार असल्याची ते म्हणाले. याबाबत सोमवारी सकाळी अधिकाऱयांची बैठक विधानसभेत होऊन वरील निर्णय घेण्यात आला.
यावेळी वास्तु शिल्पकार राहुल देशपांडे, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक संदीप फळारी, रोहन कवळेकर, यशवंत गवंडळकर, तुषार टोपले, अजित मांद्रेकर, प्रँकी कार्व्हालो आदी उपस्थित होते. आमदारांनी जागेची पाहणी केली. सध्याच्या ठिकाणी स्थानक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती जोशुआ डिसोझा यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून हा प्रस्ताव असाच पडून होता. याची दखल घेत आता या प्रकरणाला गती मिळाली आहे. पावसात येथे मच्छरांची पैदास होते. येथील काम त्वरित व्हावे यासाठी 3 कोटींची निविदा काढण्यात आली असून हे काम त्वरित हाती घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आचारसंहितेपूर्वी कामाला लागू : राहुल देशपांडे
वास्तुशिल्पकार राहुल देशपांडे म्हणाले, या जागेची पाहणी व तपासणी करण्यात आली आहे. जेणेकरुन या बसस्थानकाचे योग्यरित्या वापर करता येईल. याबाबत मुख्यमंत्री, आमदार, वाहतूक संचालक, अधिकारी वर्ग यांची संयुक्त बैठक झाली. म्हापशासाठी चांगले व पावसापूर्वी काय करता येईल याकडे लक्ष असेल. आता निवडणुका येणार असून आचारसंहितेपूर्वी काम सुरु करण्यासाठी प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
मरड – म्हापसा बायपास रस्ता
आमदार जोशुआ डिसोझांच्या पुढाकाराने 3 कोटी रुपये खर्चुन बसस्थानक उभारण्यात येणार आहे. येथील कचरा उचलण्यात येणार आहे. म्हापसा – मरड बायपास रस्ता तयार करण्यात येणार असून त्याबाबतही उद्या पीडीएच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.