मुख्यमंत्री येडियुराप्पा : म्हैसुरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन : व्हर्च्युअलद्वारे कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सार्वजनिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरात बसूनच ऑनलाईनद्वारे दसरोत्सवाचे कार्यक्रम पाहावेत, असे आवाहन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. शनिवारी रात्री ऑनलाईनद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन करून ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, दसरा साजरा करताना कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी. सर्वांनी मास्क परिधान करावे. तसेच सामाजिक अंतर ठेवावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंडित विनायक तोरवी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगीत विद्वान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तोरवी म्हणाले, साहित्य, कला आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी कर्नाटकने बरेच लक्ष दिले आहे. उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला पुरस्कारातून मिळालेल्या 5 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये मुख्यमंत्र्यांच्या मतदनिधीला देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सहकारमंत्री तथा म्हैसूर जिल्हा पालकमंत्री एस. टी. सोमशेखर म्हणाले, म्हैसूर दसरोत्सव सांस्कृतिक आणि पारंपरिकपणे साजरा केला जात आहे. व्हर्च्युअलद्वारे दसरोत्सवातील कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम चामुंडी टेकडी आणि राजवाडापुरतेच मर्यादित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातूनच कार्यक्रम पहावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, मंत्री सी. टी. रवि, आमदार एस ए. रामदास, एल. नागेंद्र, हर्षवर्धन, विश्वनाथ, एच. व्ही. राजीव, जिल्हाधिकारी रोहिणी सिंधुरी आदी उपस्थित होते.
दुसऱया दिवशी विशेष पूजा…
रविवारी दसरोत्सवाच्या दुसऱया दिवशी राजवाडय़ात हत्ती, घोडे आणि गायी यांची विशेष पूजा करण्यात आली. राजवाडय़ाच्या आग्नेय दिशेला असलेल्या सोमेश्वर मंदिराला वाद्याच्या गजरात जाऊन पूजा करण्यात आली. प्रत्येकवर्षी दसऱयावेळी ही पूजा करण्याची प्रथा आहे. राजवाडय़ात खासगी दरबार सुरू असून प्रमोदादेवी यांच्या नेतृत्त्वाखाली पूजा कार्यक्रम पार पडत आहे. सार्वजनिकांसह माध्यमांना प्रवेशावर बंदी आहे.