गिर्यारोहक नितीन त्यागींचा नवा विक्रम, माउंट एल्ब्रस शिखरावर यशस्वी चढाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले भारतीय गिर्यारोहक नितीन त्यागी यांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत माऊंट एल्ब्रसच्या शिखरावर भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी शनिवार, 23 सप्टेंबर रोजी माउंट एल्ब्रस शिखरावर चढाई करत तेथे तिरंग्यासह जी-20 चा ध्वज फडकवला. यातून त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला आहे.
जी-20 च्या थीममध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक विश्व, एक परिवार, एक भविष्य’ ही टॅगलाईन ठेवली होती. भारताच्या अध्यक्षतेखाली ज्या पद्धतीने हा भव्य कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याचे जगभरातून कौतुक झाले. या कौतुकात आणखी भर पाडण्यासाठी गिर्यारोहक नितीन त्यागी यांनी सरकारचे आभार मानण्याच्या उद्देशाने अनोखा मार्ग निवडला. नितीन त्यागी हे माउंट एल्ब्रसच्या उंच शिखरावर तिरंग्यासह जी-20 ध्वज फडकवणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
मार्गदर्शकाशिवाय यशस्वी चढाई
गिर्यारोहक नितीन त्यागी यांची भारताच्या यशाची पताका फडकवण्याची जिद्द किती या यशस्वी चढाईतून दिसून आली आहे. त्यांनी या दुर्गम शिखरावर गाईडशिवाय (मार्गदर्शक) मार्गक्रमण केले. साधारणपणे गिर्यारोहकांना या उंच शिखरावर चढण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते. येथे तापमान -21 अंश आहे. असे असतानाही त्यांनी या 5,642 मीटर उंच पर्वताची चढाई पूर्ण केली आहे. या पर्वतावरील सर्वोच्च शिखराचे नाव ‘वेस्टर्न पीक’ असे असून तेथे त्यांनी तिरंग्यासह जी-20 ध्वज फडकावला आहे.
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरही सर
नितीन त्यागी हे जगभरातील दुर्गम पर्वत शिखरांवर चढाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत किलीमांजारो या शिखरावरही चढाई करून तिरंगा फडकावला होता. आता आपले पुढचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याचे असल्याचे त्यागी यांनी नमूद केले. त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक देशांना भेटी दिल्या असून 2025 पर्यंत जगातील सर्व देशांना भेटी देण्याचे त्यांचे आणखी एक ध्येय आहे.