24 तासांमध्ये लावला छडा, दोन तलवारी, रॉड जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
जुने बेळगाव येथील युवकाच्या खून प्रकरणाचा केवळ 24 तासांत छडा लावण्यात आला आहे. शहापूर पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून क्षुल्लक कारणावरुन यापूर्वी झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले आहे. पोलिसांनी दोन तलवारी, एक रॉड जप्त केले आहेत.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, आर. आय. सनदी, हवालदार शामसुंदर दोड्डनायकर, एन. सी. तुरमंदी, ए. व्ही. निलाप्पण्णावर, आय. ए. बडीगेर, एस. ए. सोमापूर, एस. एम. कांबळे, एच. वाय. विभुती, एम. ए. ठकाई, एम. एम. नदाफ आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.
जुने बेळगाव येथील जयपाल मसणू गराणी (वय 36) या युवकाचा खून झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले होते. व्यवसायाने कार चालक असणाऱया जयपालचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नव्हता. केवळ 24 तासांत पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी खुनाचा तपास लावला आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बक्षीस जाहीर केले आहे.
ज्योतीराज सिद्राई दोडमनी (वय 24), अक्षय कृष्णा कोलकार (वय 24), प्रशांत यल्लाप्पा कळ्ळीमनी (वय 30), प्रताप बसवंत गराणी (वय 28), रोहित राजेंद्र दोडमनी (वय 23), शिवराज उर्फ सोन्या नागेश दोडमनी (वय 21, सर्व रा. आंबेडकर गल्ली, जुने बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्री महाराष्ट्रात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीराज व अक्षय हे दोघे या प्रकरणातील प्रमुख आहेत. खून झालेल्या जयपाल व या दोघा जणांमध्ये पूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात वितुष्ट होते. बुधवारी मध्यरात्री धुम्रपान करण्यासाठी जयपाल आपल्या घरातून बाहेर पडला. खुल्या जागेवर तो पोहोचला त्यावेळी तेथे आधीच पाच जणांची रंगीत पार्टी सुरू होती. या मैदानावर पार्टी का करता? असा जाब विचारताच वादावादी झाली. वादावादीनंतर घरातून तलवार आणून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला.
मित्रही झाला आरोपी
बुधवारी मध्यरात्री 12.30 पर्यंत शिवराज उर्फ सोन्या दोडमनी हा जयपाल सोबत होता. जयपाल आपल्या घरातून बाहेर पडला त्यावेळी सोन्या त्याच्याबरोबरच होता. उर्वरित पाच जणांनी तलवारीने हल्ला करुन जयपालचा खून केल्यानंतर सोन्या हादरला. त्याच्या हातात तलवार देवून तू पण त्याच्यावर वार कर नाही तर तुला संपवितो अशी धमकी दिल्यामुळे सोन्यानेही जयपालवर तलवारीने हल्ला केला. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.