अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंदिर खुले करण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात लेटर बॉम्ब टाकून उतरले. ‘तुम्ही सेक्मयुलर झालात की काय?’ अशा प्रकारचा घटनाद्रोही उपद्व्यापी सवाल केल्याने भारताच्या राजकारणात एकच खळबळ उडेल आणि आपली निवड करणाऱयांना ती सार्थकी लागल्याचे समाधान होईल असे त्यांना वाटले असेल. (खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा अनाठायी बोलांना अनेकदा ‘अनाब – शनाब’ ठरवलेले आहे.) कोश्यारी यांच्या लेटर बॉम्बने सुतळी बॉम्ब इतकाही आवाज होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. प्रश्नोत्तराखंडाचा एक अध्याय समाप्त होऊन आता त्यावर पारायणे-प्रवचने सुरू आहेत. आता म्हणे, ठाकरे यांच्या पत्रोत्तराने राज्यपाल समाधानी झाले नाहीत. ते आता राष्ट्रपतींना राज्याची सूत्रे हाती घ्या अशी, म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी शिफारस करतील. अर्थात या जर तरच्या बाबी आहेत आणि सूत्रांच्या हवाल्याने येणाऱया असल्या वार्ता गेल्या वर्षभरात अनेकदा पोरक्मया झाल्या आहेत. राज्यपालांना खरोखरच महाराष्ट्रात अशी राजवट लावायची होती तर कोरोनाने जेव्हा महाराष्ट्रात कहर माजला होता आणि दवाखाने अपुरे पडले होते तेव्हा वैद्यकीय आणीबाणीचे कारण पुढे करून त्यांना ती संधी साधता आली असती. (आता हिवाळय़ाचा कहर होऊन जर आकडा खूप फुगला तर त्यांना वाव आहे.) श्रद्धा आणि सबुरीपूर्वक वाट पहायला हरकत नाही. पण, राज्यात मंदिरे खुली करा म्हणून भाजप आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा काळ साधून त्यांनी त्या आंदोलनाला पोषक उपद्व्याप सुरू करून आपल्या पदाची शोभा केली आहे. वास्तविक घटनात्मकपदावर विराजमान व्यक्तीने आपण पूर्वाश्रमीचे राजकारणी आहोत हे विसरून कारभार करण्याची अपेक्षा असते. काँग्रेस काळात सत्तरच्या दशकाअखेरीस आणि ऐंशीच्या संपूर्ण दशकात राज्यपालपदावरील नेत्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. आंध्र प्रदेशमध्ये एन. टी. रामाराव हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेले असताना त्यांना पदावरून दूर करून दुसऱयाला शपथ देण्याचा अत्यंत घाणेरडा कारभार रामलाल या राज्यपालांनी केला होता. वेंकटसुबय्या, बुटासिंग, व्ही.सी. पांडे, गणपतराव तपासे, रोमेश भंडारी, सय्यद रजी अशी ही काळी यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याच्या घडीच्या राज्यपालांमध्ये महाराष्ट्राचे कोश्यारी, बंगालचे जगदीप धनकर, मेघालायाचे रॉय, नायब राज्यपाल नजीब जंग, किरण बेदी यांनी आपल्या कारभाराने स्वतःहून या यादीत आपली नावे गोवली आहेत. इंदिरा गांधी यांच्या आणिबाणी विरोधात जेलमध्ये गेलेल्या कोश्यारी यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव लक्षात घेतला आणि त्याची तुलना महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही निवडक मंत्री, आमदार, खासदारांच्या कारकिर्दीशी केली तर, कोश्यारी 1997 या वषी जेव्हा पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधान परिषदेत आमदार झाले त्यावेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या तीन टर्म गाजवून, मंत्री होऊन छगन भुजबळ विधान परिषदेत गेले होते. जयंत पाटील दुसऱयांदा आमदार होऊन विरोधी पक्षात बसले होते. पुढे त्यांनी नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, सुभाष देसाई आमदारकी भूषवून वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनले होते. अशोक चव्हाण खासदार होते. कोश्यारी नवनिर्मित उत्तराखंडसारख्या छोटय़ा राज्यात वर्षभर मंत्री आणि 29 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 असे अवघे चार महिने मुख्यमंत्री राहिले. पुढे सहा वर्षे विरोधी पक्ष नेते, खासदार राहिले. त्यांच्यापेक्षा जास्त काळ खासदार नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. साडेचार वर्षे मंत्रीपद आणि प्रदीर्घ काळ विरोधी पक्षनेतेपद राणे यांनी भूषविले. राणे भाषणाला उठायचे तेव्हा सभागृहात शांतता पसरायची. असे समकालीन नेते असलेल्या महाराष्ट्रात येऊन आपण कसे वागले पाहिजे याचा कोश्यारी यांनी विचार केला पाहिजे होता. तसे न करता ते एकाहून एक करमणूकप्रधान भेटी घेत आहेत. आगंतुक लोक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या कोरोनातील पर्यटनाचे राजभवन हे केंद्र झाले आहे. त्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इरसाल विनोद केले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रात अनेक राज्यपाल असे झाले जे पुढे राष्ट्रपती बनले. 1995 साली युतीच्या कारकिर्दीत पी. सी. अलेक्झांडर हे इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटमधले व्यक्ती राज्यपाल होते. पण, त्यांनी महाराष्ट्रात कडवट वातावरण निर्माण होऊ दिले नाही. वैधानिक विकास महामंडळ आणि विभागीय अनुशेष या बाबतीत त्यांनी जे धोरण आखून दिले तेच आजही राबवले जाते. त्याच जोरावर भाजप आणि शिवसेनेने उर्वरित महाराष्ट्रात जम बसवला. मुंडे, खडसे, गडकरी यांच्या मागे फडणवीस, गिरीश महाजन, संजय कुटे अशी भाजपच्या नव्या नेतृत्वाची घडी बसली. राज्यपाल पदावर बसलेल्या नेत्याने दरबारी राजकारण करावे. पण, अलेक्झांडर यांनी जसा आदर्श घालून दिला तसे करावे. ज्यामुळे काही नेत्यांना लगाम तर लागतो पण राजकारणही पुढे जाते. कोश्यारी जे करत आहेत ते ना राजकारण आहे ना पदाची जबाबदारी पार पाडणे आहे. देशाची सत्ता ताब्यात असलेल्या पक्षाने उत्तमोत्तम कारभार केला तर त्यांना राज्यातही जम बसवणे, बहुमत मिळवणे अवघड जात नाही. भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली आहे. अजित पवार यांना फोडून पहाटेचा शपथविधी आटोपून सुद्धा सत्ता राखता आलेली नाही हे वास्तव फडणवीस यांच्यापेक्षाही कोश्यारी यांनाच सतावते आहे की काय असे वाटावे असे त्यांचे वर्तन आहे. पत्रातील आणि उत्तरातील भाषेतून साधले काय? ‘एकच मारा पर क्मया सॉलिड मारा’ प्रकारच्या समाधानाच्या पलीकडे दोघांनी काय साधले?
Previous Articleबेगडय़ा सहानुभूतीचे राजकारण
Next Article भारतात एमआयने विकले 50 लाख टीव्ही
Related Posts
Add A Comment