ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. के वेस्ट वॉर्डकडून ही नोटीस पाठवण्यात आली असून, पालिकेचे पथक आज राणेंच्या बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करणार आहे.
आरटीआय कार्यकर्ता संतोष दौडकर यांनी 2017 मध्ये नारायण राणेंच्या जुहू येथील ‘अधिश’ नावाच्या बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. या बंगल्याचे बांधकाम ‘सीआरझेड’ नियमांचे उल्लंघन करुन करण्यात आल्यासंदर्भात ही तक्रार होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये नोटीस जारी केली आहे.
पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाच्या पथकाने शुक्रवारी जुहू तारा रोड येथील ‘अधिश’ बंगल्याला भेट देऊन पहाणी आणि मोजमाप करुन बेकायदा बांधकामांच्या तक्रारीची पडताळणी करणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यासाठी बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.