राधानगरी / प्रतिनिधी
पश्चिम घाटातील जैव विविधतेने समृद्ध, महाराष्ट्रातील सर्वात जुने व पहिले अभयारण्य असलेले राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 1 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे.
दरवर्षी जुन ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळी ऋतूत अभयारण्य पर्यकांसाठी बंद केले जाते. सध्या हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण, जंगलात पसरलेली हिरवळ, वन्यप्राणी, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकाना अभयाण्याचे दरवाजे 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होत आहेत. जंगल सफारी मध्ये ठक्याचा वाडा, मुरडा बांबर, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी, सांबर कुंड, शिवगड हाडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे, निरीक्षण मनोरे पाहता येतील.
दररोज सकाळी 6 वाजता सफारी ला सुरवात होणार असून दुपारी 2.30 पर्यंत जंगल सफारी साठी प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक मंगळवारी अभयरण्यास साप्ताहिक सुट्टी असेल.अभयारण्यात दुचाकी व खासगी वाहनांना बंदी असून वन्यजीव विभाग मार्फत कार्यरत किंवा वन्यजीव विकास समिती मार्फत स्थानिकांच्या ओपन व बंदिस्त जीप मधून जंगल सफारी करता येणार आहे.
स्थानिक युवक गाईड म्हणून पर्यटकांना जंगल ची ओळख करून देतील. प्रवेश फी व गाडी भाडे भरून जंगल सफारीचा आनंद लुटता येईल. राधानगरी येथील फुलपाखरू उद्यान व दाजीपूर येथील जंगल माहिती केंद्र ही पाहता येते. वन्यजीव विभाग व स्थानिकांच्या वतीने दाजीपूर व राधानगरी येथे निवास व भोजनची व्यवस्था केलेली आहे. निसर्गातील जैवविवीधता अनुभवण्यासाठी सर्व पर्यटकांचे राधानगरी अभयारण्यात स्वागत आहे. अशी माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे