मोले येथील प्रचार सभेत मनोज परब यांची घोषणा
प्रतिनिधी /धारबांदोडा
rयेणाऱया निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्सचे सरकार सत्तेवर आल्यास पहिल्याच विधानसभा अधिवेशनात पोगो बिल संमत केले जाईल. गोवेकरांची जमिन त्यांना मिळावी यासाठी जमिन हक्क कायदा विधेयक व जमिनींच्या बेकायदेशीर रुपांतराला आळा घालण्यासाठी जमिन रुपांतर प्रतिबंधक कायदा विधेयक आणण्याची घोषणा मनोज परब यांनी मोले येथे सभेत केली.
मोले येथील पंचायत मैदानावर सावर्डे मतदारसंघाचे उमेदवार विपीन विष्णू नाईक यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्रात गोवेकरांना प्राधान्य तसेच रोजगार व व्यावसाय करण्यासाठी संधी या गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावर्डे भागातील खाण व्यवसाय गेल्या 10 ते 12 वर्षांपासून बंद आहे. मात्र तो पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला नाही. दुसरा पर्यायही उपलब्ध करून दिलेला नाही. या भागातील बहुतेक कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खाण व्यावसायाबाबत सरकार कायम चालढकल करीत असल्याचा आरोप परब यांनी केला.
मोले येथे होऊ घातलेल्या तीन राष्ट्रीय प्रकल्पावर बोलताना, हे प्रकल्प आणून सरकार पर्यावरण व येथील नैसर्गिक साधनसंपत्तीवर घाला घालण्यास पुढे सरसावले आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार देण्याची घोषणा ही निव्वळ फसवणूक आहे. गोवेकर आर्थिकदृष्टय़ा सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी नवीन गोव्याची उभारणी करावी लागेल. गोमंतकीयांचे हित पाहणारे नवीन सरकारच ते करु शकते. गोव्यात नवीन क्रांती व बदल घडवून आणण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्सला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विपीन नाईक म्हणाले, सावर्डे मतदरसंघात अजूनही बऱयाच समस्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात रिव्होल्युशनरी गोवन्सने सावर्डे मतदारसंघात महिला सशक्तीकरणासाठी काही योजना आखल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रत्येक गावात जाऊन तेथील समस्यांचा आपण आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तिओतीन यांचेही यावेळी भाषण झाले.