वाहने अडवून पोलिसांकडून विचारपूस, प्रमुख मार्गांवरून गस्तही वाढविली
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे साहजिकच पोलिसांनीही खबरदारी वाढविली असून प्रमुख रस्त्यांवर वाहने अडवून अनावश्यकपणे फिरणाऱया वाहनचालकांना घरचा रस्ता दाखवण्यात येत होता. सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळात तपासणी वाढविण्यात आली होती.
सिव्हिल हॉस्पिटलकडून सदाशिवनगरला जाणाऱया मार्गावर खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आपल्या सहकाऱयांसह ठाण मांडून होते. कोल्हापूर सर्कलजवळही वाहने अडवून अनावश्यकपणे फिरणाऱयांना परत पाठविण्यात येत होते. तर चन्नम्मा सर्कलजवळ मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी आदी अधिकारी ठाण मांडून होते.
वाहतूक पोलिसांबरोबरच नागरी पोलिसांनीही वाहनचालकांना अडवून प्रत्येकाचे पास तपासण्यात येत होते. ज्यांच्याजवळ पास नाही किंवा बाहेर फिरण्यासाठी सबळ कारणही नाही अशा वाहनचालकांना दरडावून परत पाठविण्यात येत होते. अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंगही घडत होते.
सध्या दुचाकीवरून केवळ एकाला फिरण्याची मुभा आहे. मात्र, चन्नम्मा सर्कलजवळ एका दुचाकीवर तीन-तीन जाताना पोलिसांना आढळून आले. अशा वाहनचालकांना अडवून त्यांना तंबी देऊन सोडून देण्यात येत होते. याच वेळी महानगरपालिकेशी संबंधित एक कारही पोलिसांनी अडविली.
या कारमध्ये कोणीही अधिकारी नव्हते. मात्र, या कारच्या काचांना काळी फिल्म लावण्यात आली होती. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी याला आक्षेप घेतला. काचांना काळी फिल्म लावण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे त्या त्वरित हटव, अशी सूचना त्यांनी कारचालकाला केली. त्यानंतर कारचालकाने ती फिल्म हटविली.
सदाशिवनगरहून चन्नम्मा सर्कलकडे येणाऱया मार्गावरही अनेकजण खोटेनाटे सांगून शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस त्याला अडवून कारण विचारत होते. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱयांना पोलीस दलाने पास वितरित केले आहेत. पास तपासूनच सकाळच्या सत्रात शहरात प्रवेश देण्यात येत होता. पास नसणाऱयांना परत पाठविण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला होता.
वाहतूक पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप
कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. बुधवारी आयुष विभागाने वाहतूक पोलिसांना च्यवनप्राशचे वितरण केले आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांच्या उपस्थितीत च्यवनप्राशचे वाटप करण्यात आले. कन्नड साहित्य भवनच्या आवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी आयुष विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.