वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक षटकार नोंदवण्याचा विक्रम या सामन्यात नोंदवला. रोहितने कॉलिन अॅकरमनला लाँगऑनच्या दिशेने 92 मीटर्स अंतरावर उत्तुंग षटकार ठोकत हा विक्रम केला. या वर्षातील त्याचा हा 59 वा षटकार होता. त्याचे आता एकूण 60 षटकार झाले आहेत.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्सने 2015 मधील स्पर्धेत एकूण 58 षटकार नोंदवले होते. त्याचा हा विक्रम रोहितने या सामन्यात मागे टाकला. त्याच्याकडे फलंदाजीचे खास कौशल्य असून या बळावर त्याने ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी यासारख्या बिगहिटर्सना मागे टाकले आहे. गेलने 2019 मध्ये 56 तर आफ्रिदीने 48 षटकार मारले होते.
वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणूनही रोहितच्या नावे सर्वाधिक षटकारांची नोंद झाली आहे. त्याने 23 वा षटकार मारत 2019 मध्ये इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नोंदवलेला 22 षटकारांचा विक्रम मागे टाकला. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार नोंदवण्यात डीव्हिलियर्सन तिसऱ्या (2015, 21 षटकार), अॅरोन फिंच चौथ्या (2019, 18), ब्रेडॉन मेकॉलम (2015, 17) पाचव्या स्थानावर आहे.
500 हून अधिक धावा दोनदा जमविणारा रोहित पहिला फलंदाज
या वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली असून रोहित शर्माचा फॉर्म हे त्याचे एक कारण आहे. या सामन्यात त्याने 54 चेंडूत 61 धावा फटकावताना त्याने एक नवा विक्रमही केला. सलग दोन वर्ल्ड कपमध्ये पाचशेहून अधिक धावा जमविणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. 2019 मधील स्पर्धेत त्याने 648 धावा जमविल्या होत्या तर आता त्याने 503 धावा जमविल्या आहेत. या वेळच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांत तो चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने दोनदा असा पराक्रम केला होता. पण 1996 व त्यानंतर 2003 मध्ये त्याने पाचशेहून अधिक धावा जमविण्याचा विक्रम केला होता. याशिवाय पाचशेहून अधिक धावा जमविणारा पहिला कर्णधार होण्याचा मानही रोहितने मिळविला आहे. सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदला आहे.