ऑनलाईन टीम / पुणे :
वयाची साठी ओलांडली, पती आजारी, घरात हालाखीची आर्थिक परिस्थिती अशा संघर्षमय वातावरणात जगावे तरी कसे? असा प्रश्न मनात आहे. परंतु, जगण्याचा संघर्ष कुणालाच चुकला नाही, आपण हार मानली तर सर्वच संपणार ही खूणगाठ मनात पक्की करून जिद्दीने संसार उभा करण्याचा निर्णय लता करे यांनी घेतला. याच सामान्य महिलेची असामान्य यशोगाथा असलेल्या ‘लता भगवान करे’ या मराठी चित्रपटाचा टेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘लता भगवान करे’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. वयाच्या 65 व्या नऊवारी साडीमध्ये धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱया लता करे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. त्यांनी सलग तीन वेळा बारामती मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे.
चित्रपटातील सर्व कलाकार हे यापूर्वी कधीच अभिनय न केलेले आहेत. प्रत्येक कलाकार वेगळय़ा क्षेत्रात कार्यरत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.
आराबोथु कृष्णा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांनी संगीत दिले आहे तर पार्श्वसंगीत कन्नू समीर यांचे आहे. ‘लता भगवान करे’ हा चित्रपट येत्या 17 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.