आमदार सुभाष शिरोडकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ फोंडा
पत्रकार आपल्या लेखणीद्वारे समाजात आमुलाग्र बदल घडवून आणू शकतात तसेच आजवरच्या पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. 50 शिक्षकांचे कार्य ए पत्रकाराच्या लेखणीतून समाज परिवर्तनासाठी होऊ शकते, असे प्रतिपादन शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले.
फार्मागुढी येथील पर्यटन कुटीरामध्ये गोवा मराठी पत्रकार संघातर्फे वार्षिक आमसभा व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक, बोरीचे सरपंच सुनील सावकर, जि. पं. सदस्य व पत्रकार मोहन वेरेकर, दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, पत्रकार संघाचे सरचिटणीस रमेश वंसकर, तरुण भारतचे उपसंपादक राजेश परब, जनार्दन नागवेकर, योगेश दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणासाठी अहर्निशपणे कार्य केले
शिरोडकर पुढे म्हणाले की शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आयुष्यात अहर्निशपणे झपाटून कार्य केले. शिरोडा गावात होमिपॅथिक महाविद्यालय, अभियांत्रिकी विद्यालय, इन्फोटेक्नॉलाजी सारख्या शिक्षणाची सोय या गावात उपलब्ध झाल्याने शिरोडा गोवा तसेच देश विदेशातील विद्यार्थ्याना या शैक्षणिक संस्थानात शिक्षण देण्याची संधी उपलब्ध झाली. आज शेकडो इंजिनिअर, शेकडो डॉक्टर तयार तयार होऊन विविध क्षेत्रात कार्य करताना पाहून समाधान होते.
येत्या दोन वर्षात शैक्षणिक कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम घडवून आणला जाणार आहे. शिरोडय़ाचे दैवत श्री कामाक्षीच्या स्तोत्रात विज्ञानवृद्धी आहे. हा मतितार्थ लक्षात घेऊन शिरोडा गाव विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्फोटेक्नॉलाजी क्षेत्रात पुढे येण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा आपला मनोदय आहे, असे शिरोडकर म्हणाले.
संघार्षानंतर मिळते यश : नाईक
जीवनात संघर्ष करून आणि खडतर प्रयत्न करून माणसांना मोठे व्हावे लागते. आमदार सुभाष शिरोडकर यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला अधिक महत्व देऊन शिरोडय़ाच्या पवित्र भूमित त्यांनी उभारलेले ज्ञानदानाचे पवित्र संकुल हे पुढचे भवितव्य घडविण्याचे मोठे केंद्र आहे, असे पत्रकार राजू नाईक यांवेळी म्हणाले.
याप्रसंगी आमदार सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते पत्रकार मोहन वेरेकर, बोरीचे सरपंच सुनील सावकर यांचा शाल, श्रीफळ व श्री गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांच्या हस्ते शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुनील सावकर म्हणाले, की पत्रकारांनीही कोणत्याही घटनांची सत्यता पडताळून पाहून वस्तुनिष्ठ बातम्यांवर भर द्यावा. गोवा मुक्तीनंतर गोव्यातील वृत्तपत्रांनी गोव्याच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
संतोष गोवेकर यांचे याप्रसंगी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करणारे भाषण झाले. जनार्दन नागवेकर यांनी स्वागत गीत सादर केले. पत्रकार संघाचे सरचिटणीस रमेश वंसकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजेश परब यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार तसेच जादुगार पी. ए सूर्यवंशी यांचे जादूचे प्रयोग, श्रीकांत साळगावकर यांचा नकलांचा कार्यक्रम झाला. श्रीकांत च्यारी यांनी काराओके गीत गायन केले. सुरुवातीलस सर्व पत्रकारांनी फार्मागुढी येथील श्री कटमगाळ दादांचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर पंचवाडी येथील म्हैसाळ धरणाला भेट देऊन पाहणी केली. विविध वृत्तपत्रांचे उपसंपादक, प्रतिनिधी, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी या स्नेहमेळाव्यात सहलीत सहभागी झाले होते.