भारताने आता लॉकडाऊन उठविण्याविषयी हालचाल सुरू केली आहे. तथापि, लॉकडाऊनमधील ढिलाई महाग पडू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. देश अधिक काळ लॉकडाऊनमध्ये राहू शकत नाही, हे खरे असले तरी तो उठविताना जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली पाहिजेत. लोकांनी शारीरिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम न पाळल्यास कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू शकते. तसेच सामाजिक संक्रमणाचाही धोका निर्माण होऊ शकतो.
सरकारने आतापर्यंत सामाजिक संक्रमण सुरू न झाल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. तथापि, स्थिती अशीच कायम राहणार नाही. काही दिवसांपूर्वीपासूनच भारतात काही समाजांमध्ये कोरोना संक्रमणाने गंभीर रूप धारण केले आहे. तथापि, पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथरेड्डी यांच्या मते सामाजिक संक्रमण आपण कोणता निकष मानता त्यावर अवलंबून आहे.