मुंबईहून येत होता कुडाळला : वाटेत पोलिसांनी अटकाव केल्याने अंत्यदर्शनाची इच्छा राहिली अपूर्ण
वार्ताहर / कुडाळ
तालुक्यातील आंदुर्ले-आवेरे येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी मुंबईहून गावी निघालेल्या मुलाला पोलिसांच्या अटकावामुळे अर्ध्यावरूनच माघारी परतावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे मुलाला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही व अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. आता किमान त्यांच्या दिवस कार्याला तरी मुलाला गावी जायला मिळते की नाही, या विवंचनेत हे कुटुंब आहे.
आंदुर्ले आवेरे येथील सुधाकर अंकुश शिरोडकर (53) यांना शुक्रवारी सायंकाळी तेथील काजूच्या बागेत काजू काढत असताना हृदयविकाराचा धक्का बसला अन् त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा प्रदीप सुधाकर शिरोडकर मुंबई येथील एका न्यूज चॅनेलमध्ये नोकरीला आहे. लॉकडाऊनमुळे वडिलांच्या अंत्यविधीसाठी येताना त्याला अडचणी येणार हे निश्चित होते. मुलाने पतीच्या अंत्यविधीसाठी गावी यावे, अशी प्रदीप यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे पं. स. माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांचे याकडे लक्ष वेधले. प्रदीप हे मुंबई येथील ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात, त्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना गावी पाठविण्याची कार्यवाही सुरू झाली. परवानगीबाबतचे सोपस्कार पूर्ण झाले आणि ते गावी यायला निघाले. तत्पूर्वी, बंगे यांनी निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल साळुंखे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली. त्यांनी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली.
गावी निघालेल्या प्रदीप यांना वाटेत रोहा पोलिसांनी अडविले. त्यांनी पोलिसांना प्रवास परवानगी दाखविली व गावी पाठविण्याची विनंती केली. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. निवती पोलिसांना फोन करण्यासही रोहा पोलिसांनी नकार देत प्रदीप यांना माघारी पाठविले. कोरोनामुळे आपण येऊ शकत नाही, असा संदेश त्यांनी मोबाईलवरून गावातील नातेवाईकांना दिला. त्यामुळे सुधाकर यांच्या चुलत भावाने त्यांना अग्नी दिला. शिरोडकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सुधाकर यांच्या अकाली निधनाने शिरोडकर कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा वडिलांचे अंत्यदर्शन घेऊ शकला नाही, त्यांना अग्नीही देऊ शकला नाही हे दु:खही त्यांच्या जिव्हारी लागले आहे. वडिलांच्या दिवसकार्यासाठी तरी प्रदीप यांना गावी येता यावे, अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. याच चिंतेत ते व त्यांचे कुटुंब आहे.