चार वर्षांनंतर चिपळूण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
चिपळूण प्रतिनिधी
घरातील किरकोळ वादातून सासुने आपल्या सुनेवर सुऱ्याचे तब्बल 36 वार करत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना 4 वर्षांपूर्वी वालोपे-देऊवाडी येथे घडली होती. याप्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना सासूला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत दोघा साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली असून सरकारी वकील म्हणून ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले.
रेणुका नामदेव करकाळे (55, मूळगाव वाघझरी, तालुका उदगिर, जिल्हा लातूर) असे शिक्षा सुनावलेल्या सासूचे नाव आहे. रेणुकाने तिची सून परी प्रशांत करकाळे (25) हिचा निर्घृण खून केला होता. करकाळे हे कुटुंबिय मूळचे लातूर जिल्ह्यातील असून ते काही वर्षांपासून चिपळुणातील वालोपे-देऊळवाडीत राहण्यास आले होते. 2012 मध्ये परी हिचा प्रशांत करकाळे यांच्याशी विवाह झाला होता. यानंतर सासू रेणुका व सून परी या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. हे वाद मिटवण्यासाठी अनेकदा बैठकाही झाल्या. मात्र त्यातून तोडगा न निघाल्याने अखेर त्यांच्यातील हा वाद पुढे सुरुच राहिला. 29 एपिल 2017 रोजी त्या दोघी घरात असताना त्या दोघीमध्ये पुन्हा वाद झाला व तो विकोपाला गेला. यातूनच रागाच्या भरात सासू रेणुकाने सून परी हिच्या शरिरावर सुरीने तब्बल 36 वार करून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना घडताच परी हिचा मुलगा ओम याने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. तोपर्यंत परी रक्ताच्या थारोळयात निपचित पडली होती.
या घटनेची माहिती वालोपेचे पोलीस पाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी रेणुका हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली होती. या गुह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह हेडकॉन्स्टेबल विनायक चव्हाण, महिला हेडकॉन्स्टेबल वेदा मोरे यांनी केला होता.
मंगळवारी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात या गुह्याच्या अंतिम सुनावणीवेळी 15 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले होते. याबरोबरच स्मिता मयेकर व अजय कदम या दोघांनी दिलेली साक्ष खूप महत्वाची ठरली आहे. तसेच सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी अभ्यासपूर्वक केलेला युक्तीवाद यासह घटनेदरम्यान सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून अखेर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमिन यांनी रेणुका करकाळे हिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासह 10 हजाराचा दंडही ठोठावला असून हा दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.